Yashvantrao Gadakh : यशवंतराव गडाखांनी बाळासाहेब विखे पाटील यांना पराभूत केलं, पण...

Balasaheb Vikhe Patil vs Yashvantrao Gadakh : 1991 च्या लोकसभा निवडणुकीत अहमनगरमध्ये शरद पवार-बाळासाहेब विखे पाटील यांच्यात टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला होता. या निवडणुकीत यशवंतराव गडाख यांनी बाळासाहेब विखे पाटील यांचा पराभव केला.
yashwantrao Gadakh, balasaheb vikhe patil
yashwantrao Gadakh, balasaheb vikhe patilSarkarnama
Published on
Updated on

Yashwantrao Gadakh Political Journey : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आहमदनगरचे विखे पाटील घराणे यांच्यात पूर्वीपासून चालत आलेला राजकीय संघर्ष अद्यापही संपलेला नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्याची पुन्हा प्रचिती आली. अहमदनगर दक्षिण मतदारसंघात निलेश लंके यांना लोकसभेच्या मैदानात उतरवून शरद पवार यांनी मोठ्या कालावधीनंतर पुन्हा एकदा विखे पाटील घराण्याला पराभवाची धूळ चारली. लंके नव्हे तर शरद पवार विरुद्ध विखे पाटील असेच स्वरूप या निवडणुकीला आले होते. अशाच स्वरूपाची चुरशीची लढत असणारी 1991 ची लोकसभा निवडणूक देशभरात गाजली होती. यशवंतराव गडाख यांनी बाळासाहेब विखे पाटील यांचा पराभव केला होता. नेमकं काय झालं होतं त्या निवडणुकीत, हे सविस्तरपणे पाहू.

राजकारण म्हटलं की संघर्ष आलाच. काही राजकीय घराण्यांमध्ये पिढ्यान् पिढ्यांपासून हा संघर्ष चालत आलेला आहे. शरद पवार आणि विखे पाटील यांच्यातील राजकीय संघर्षही असाच जुना आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीतही तो दिसून आला. पवार आणि विखे यांच्यात 1991 च्या लोकसभा निवडणुकीत तर अत्यंत टोकाचा संघर्ष झाला होता. त्यावेळी यशवंतराव गडाख यांनी बाळासाहेब विखे पाटील यांचा पराभव केला होता. शरद पवार यांनी प्रचारादरम्यान आपलं चारित्र्यहनन केल्याचा खटला बाळासाहेब विखे पाटलांनी (Balasaheb Vikhe Patil) न्यायालयात दाखल केला होता. न्यायालयाने सर्व बाबी तपासून बाळासाहेब विखे पाटील यांना विजयी ठरवलं होतं. या एेतिहासिक निकालानंतरही यशवंतराव गडाख आणि बाळासाहेब विखे पाटील यांच्यातील कटुता जास्त काळ टिकली नव्हती. पुढे काही वर्षांनंतर बाळासाहेब विखे पाटील हे गडाखांच्या मदतीला धावून गेले होते.

त्यावेळी देशाच्या राजकारणात शरद पवार (Sharad Pawar) यांचा दबदबा होता. शरद पवार यांच्याबाबत अनेक मिथकं आहेत. एखादी राजकीय उलथापालथ झाली की त्यामागे शरद पवार यांचा हात आहे किंवा होता, असे विरोधकांकडून म्हटले जाते. अगदी आताही तशीच परिस्थिती आहे. या अगोदर 1991 च्या निवडणुकीतही असंच झालं होतं. त्यावेळी काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते. बाळासाहेब विखे पाटील हे कोपरगाव मतदारसंघातून निवडणूक लढवायचे.

ते माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांचे निकटवर्तीय समजले जायचे. त्यामुळे पक्षानं कोपरगाव मतदारसंघातून त्यावेळी त्यांची उमेदवारी कापली. यशवंतराव गडाख आणि बाळासाहेब विखे पाटील हे दोघेही त्यावेळी काँग्रेसमध्ये होते. गडाख यांना राज्याच्या राजकारणात परतायचं होतं. त्यामुळे अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून बाळासाहेब विखे पाटील यांनी निवडणूक लढवावी, अस त्यांनी सांगितल होत. मात्र राजीव गांधी यांनी त्याला नकार दिला. गडाख यांनीच निवडणूक लढवावी, असा त्यांचा आग्रह होता. मात्र शरद पवार यांनीच आपली उमेदवारी कापली, असा समज बाळासाहेब विखे पाटील यांचा झाला. त्यामुळे त्यांनी अहमदनगरमधून अपक्ष उमेदवारी दाखल केली होती.

yashwantrao Gadakh, balasaheb vikhe patil
Vasantdada Patil : गाव तेथे कार्यकर्ता असलेला मुख्यमंत्री : वसंतदादा पाटील

शरद पवार विरुद्ध विखे पाटील हा संघर्ष 1991 च्या या निवडणुकीत टोकाला गेला होता. राजकारणातील टोकाचा संघर्ष कसा असतो, हे महाराष्ट्राने त्यावेळी पाहिलं होतं. यशवंतराव गडाख यांना उमेदवारी मिळाली म्हणून बाळासाहेब विखे पाटील यांनी माघार घेतली नव्हती. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करत विखे पाटील अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्या निवडणुकीत यशवंतराव गडाख (Yashwantrao Gadakh) विजयी झाले. अर्थातच शरद पवार यांनी यशवंतराव गडाख यांच्या प्रचारात स्वतःला झोकून दिलं होतं. त्यांनी आपली पूर्ण ताकद गडाख यांच्या पाठिशी उभी केली होती. मात्र, हा पराभव बाळासाहेब विखे पाटलांच्या जिव्हारी लागला होता.

काही दिवसांनंतर त्यांनी या निकालाच्या विरोधात न्यायालयाचं दार ठोठावलं. त्यांनी गडाख यांच्या प्रचारावर आक्षेप घेतला. 1993 मध्ये या खटल्याचा निकाल लागला. प्रचारादरम्यान शरद पवार यांनी जाणीवपूर्वक आपलं चारित्र्यहनन केलं, याचे पुरावे विखे पाटलांनी न्यायालयात सादर केले. न्यायालयाने यशवंतराव गडाख यांची निवड रद्द करून बाळासाहेब विखे पाटील विजयी झाल्याचा निकाल दिला. न्यायालयाने गडाख यांच्यावर सहा वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घातली. हा निकाल देशाच्या राजकारणासाठी ऐतिहासिक ठरला. आचारसंहितेचा भंग करणे किती महागात पडू शकते, हे त्या निकालानं दाखवून दिलं होतं. निवडणुकीत आचारसंहितेचं गांभीर्य त्यानंतरच वाढलं, असं म्हणता येईल.

yashwantrao Gadakh, balasaheb vikhe patil
Gulzarilal Nanda : दोनदा पंतप्रधान आणि राहायला घर नाही...!

त्यापूर्वी, 1991 च्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिणमधून कोणाला उमेदवारी मिळणार, हे काँग्रेसकडून लवकर निश्चित होत नव्हतं. या जागेवरून गडाख तर कोपरगावमधून बाळासाहेब विखे पाटील लढायचे. शह-काटशहाच्या पक्षांतर्गत राजकारणातून विखे पाटील यांना कोपरगावमधून डावलण्यात आलं होतं. त्यामुळं त्यांनी अहमदनगरमधून अपक्ष लढण्याची तयारी सुरू केली होती. गडाख यांनी विखे यांना काँग्रेसच्या उमेदवारीवर लढा, असं सांगितलं होतं, कारण त्यांना राज्याच्या राजकारणात यायचं होतं. मात्र राजीव गांधी हे गडाख यांच्या उमेदवारीवरच ठाम राहिले. उमेदवारी बदलण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळं राजकीय संघर्ष वाढला, तो टोकाला गेला. त्यातून विखेंच्या विरोधातील प्रचाराला धार चढली. विखे यांनी जनता दलाला 50 लाख रुपये दिले, जनता दलाच्या उमेदवारानं अहमदनगर मतदारसंघातून माघार घेऊन बीड मतदारसंघातून लढावं, यासाठी त्यांना 20 लाख रुपये दिले, मतदारांना आमिषे दाखवली, कामगारांना धोतर, दारूचं वाटप केलं, असा प्रचार करण्यात आला, असं बाळासाहेब विखे पाटील यांनी न्यायालयात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटलं होतं. शरद पवार यांचा त्यावेळी देखील देशभरात दबदबा होता. त्यामुळं या निकालाची मोठी चर्चा झाली होती.

यशवंतराव गडाख यांच्यावरील निवडणूक लढवण्यास सहा वर्षांची बंदी 1997 मध्ये संपली होती. राजकारणात पुनरागमन करत त्यांनी अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडणूक लढवली. शिवसेनेचे डॉ. भारत ढाकणे यांचा पराभव करत ते विजयी झाले. त्यावेळी गडाख यांना विविध पातळ्यांवर संघर्ष करावा लागला होता. पुढे 2003 मध्ये यशवंतराव गडाख पुन्हा निवडणुकीला उभे राहिले. त्या निवडणुकीतही ते विजयी झाले. ही निवडणूक एका वेगळ्या अर्थाने महत्वाची ठरली. 1991 च्या लोकसभा निवडणुकीत गडाख आणि विखे पाटलांतील टोकाचा संघर्ष महाराष्ट्राने पाहिला होता. 2003 च्या निवडणुकीत विखे पाटील हे ती कटुता बाजूला सारून गडाख यांच्या मदतीला धावून आले होते. झालं गेलं विसरून विखे पाटील यांनी मला मदत केली होती, उपयुक्त सल्ला दिला होता, असं गडाख यांनी मागे एकदा सांगितलं होतं.

कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसतानाही यशवंतराव गडाख यांनी राजकारणात जम बसवला. साहित्यिक म्हणून वेगळी ओळख निर्माण केली. सोनई या छोट्याशा गावात त्यांचं बालपण गेलं. ग्रामीण भागाचा कायापालट करण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं. गडाख हे सुधारणावादी विचारांचे आहेत. वडिलांच्या निधनानंतर दहाव्याला जेवण न घालता त्यांनी ती रक्कम मागासवर्गीय वस्तीतील शाळेसाठी दिली होती. त्यांचं प्राथमिक शिक्षण गावातच झालं. शेतीशाळेत शिकल्यामुळे त्यांच्यात शेतीबाबत आवड निर्माण झाली. सातवीनंतर गावात पुढील शिक्षणाची सोय नव्हती. नंतर 1956 मध्ये गावात शाळा सुरू झाली आणि त्यांनी 11 वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांचं शिक्षण थांबलं आणि ते शेती पाहू लागले. विवाहानंतर त्यांनी अहमदनगर येथील महाविद्यालयातून बीएची पदवी मिळवलीच. महाविद्यालयात त्यांनी सचिवपदाची निवडणूक जिंकली आणि एका तरुण राजकीय नेतृत्वाला आकार मिळू लागला. बीएड केल्यानंतर त्यांना शिक्षकाची नोकरी मिळाली. गावकऱ्यांच्या आग्रहामुळे 1967 मध्ये त्यांनी नेवासा पंचायत समितीची निवडणूक लढवली. पुढे ते पंचायत समितीचे सभापतीही झाले. अहमदनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं.

यशवंतराव गडाख यांनी सोनई येथे मुळा सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना त्यांनी शेतकऱ्यांना गायींचं वाटप केलं. अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी त्या काळात सेवा संस्थांमार्फत शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिलं. 1978 मध्ये त्यांनी मुळा शिक्षण संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून प्राथमिक ते पदव्युत्तर पर्यंतच्या शिक्षणासह एमबीए, फार्मसी, डेंटल असे व्यावसायिक अभ्यासक्रमही सुरू केले. ग्रामीण भागाचा कायापालट करण्याचं आपलं स्वप्न यशवंतराव गडाख यांनी अशा पद्धतीनं पूर्ण केलं. नेवासा ही संत ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी. त्यामुळे गडाख यांनी 1990 मध्ये नेवाशात श्री ज्ञानेश्वरी सप्तशताब्दी महोत्सवाचे आयोजन केलं. श्री ज्ञानेश्वर सांस्कृतिक प्रतिष्ठानचीही त्यांनी नेवासा येथे उभारणी केली.

yashwantrao Gadakh, balasaheb vikhe patil
Kisanarao Bankhele : केवढा साधा आमदार ना? बायको चक्क मजुरी करायची!

1970 मध्ये अहमदनगर येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं स्वागताध्यक्षपद गडाख यांनी भूषवलं. त्यांच्या 'अर्धविराम' या आत्मचरित्राचं प्रकाशन 2003 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. या आत्मचरित्राच्या हिंदी आवृत्तीचं प्रकाशन तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या हस्ते दिल्लीत झालं. 2009 मध्ये त्यांचं दुसरं पुस्तक 'सहवास' प्रकाशित झालं. त्यांच्या साहित्यकृतींना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. साहित्याच्या क्षेत्रातही रमणाऱ्या गडाख यांनी 1991 च्या निवडणुकीत विखे पाटील यांचा पराभव करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com