Manohar Joshi : दावा भाच्याचा, पण मामा झाले मुख्यमंत्री

Manohar Joshi Sarkarnama Podcast : युतीची सत्ता आल्यानंतर सुधीर जोशी मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा होती, मात्र स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे सर्व पक्षांत चांगले संबंध असलेल्या मनोहर जोशी यांना बाळासाहेब ठाकरे यांनी पसंती दिली होती.
Manohar Joshi
Manohar Joshi sarkarnama
Published on
Updated on

Sudhir joshi Manohar Joshi Podcast : राजकारणात साध्या, सरळ नेत्यांची सर्वच पक्षांत वानवा आहे. शिवसेनेसारख्या आक्रमक पक्षात असा एक साधा, सरळ, गाजावाजा न करता आपलं काम शांततेत करणारा एक नेता होता, हे आजच्या पिढीला खरं वाटणार नाही. होय, सुधीर जोशी! प्रारंभीच्या काळात शिवसेनेची भूमिका प्रचंड आक्रमक होती. त्या काळातही साधे, सरळपणामुळं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांना मोठ्या आदराचं स्थान होतं. ते सुधीरभाऊ या नावानं ओळखले जायचे.

दिवंगत सुधीर जोशी यांनी राज्याचे महसूल, शिक्षणमंत्री म्हणून काम पाहिलं. शिवसेनेत त्यांचं नाव आणि स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. शिवसेना घराघरांत रुजवण्यात ज्या नेत्यांचा वाटा होता त्यात सुधीर जोशी यांचं नाव अगदी वरच्या क्रमांकावर येईल. गाजावाजा न करता शांततेत आपलं काम करत राहणं, हे त्यांच वैशिष्ट्य होतं. अशा या सुधीर जोशी यांना 1995 मध्ये मुख्यमंत्रिपदाची संधी होती. त्यांचं नाव जवळपास निश्चित झालं होतं, पण ऐनवेळी संधी मिळाली ती मनोहर जोशी यांना. सुधीर जोशी हे मनोहर जोशी यांचे भाच्चे होते. या दोघांच्या वयात केवळ तीन वर्षांचं अंतर होतं.

राजकारणात प्रवेश करण्याच्या आधीपासून हे मामा-भाच्चे एकत्र काम करायचे. कार भाड्यानं देण्याचा दोघांचा व्यवसाय होता. त्यातूनच त्यांचा बाळासाहेब ठाकरे यांच्याशी परिचय झाला. बाळासाहेबांकडे गाडी नव्हती, त्यावेळी या दोघा मामा-भाच्च्यांनी त्यांचं सारथ्य केलं होतं. बाळासाहेबांचे सारथ्य करत या दोघांनाही अवघा महाराष्ट्र पायांखाली घातला होता. सुधीर जोशी यांची ड्रायव्हिंग बाळासाहेबांना खूप आवडायची.

वयाच्या 27 व्या वर्षी सुधीरभाऊ मुंबईचे नगरसेवक झाले. ते वर्ष होते 1968. त्यांना भाषण करण्याची सवय नव्हती, पण निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी केलेली भाषणं लोकांना आवडली. त्यांनी सभागृह दणाणून सोडलं. त्यानंतरच्या निवडणुकीतही ते निवडून आले आणि त्यांची महापौरपदी वर्णी लागली. सुधीरभाऊंच्या रूपानं शिवसैनिकाला संधी मिळाली होती. महापौरपदासाठी त्यावेळी मनोहर जोशी आणि वामनराव महाडिक हेही स्पर्धेत होते. खरंतर या दोघांपैकीच एकाचीच निवड होणार, असं वातावरण होतं.

बाळासाहेबांच्या मनात मात्र वेगळाच विचार सुरू होता. सुधीरभाऊ यांचं व्यक्तिमत्व अभ्यासू, संयमी आणि कार्यकुशल होतं. बाळासाहेबांनी वामनराव महाडिक आणि मनोहर जोशी यांची नावं बाजूला सारली आणि सुधीरभाऊंना संधी दिली. वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी सुधीरभाऊ मुंबईचे महापौर बनले, त्यांनी आपल्या कामचा ठसा उमटवला. ते 1978 पर्यंत मुंबईचे नगरसेवक राहिले.

Manohar Joshi
Vilasrao Deshmukh : स्वतंत्र खोलीसाठी वाद, धोतरासह आमदार उतरले स्वीमिंग पूलमध्ये

स्थानिय लोकाधिकार समितीवर मिळालेल्या संधीचंही सुधीरभाऊ यांनी सोनं केलं. राज्यातील भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळवून देणं, हे या समितीचं काम होतं. सुधीरभाऊंची भूमिका अशीच होती. या माध्यमातून त्यांनी राज्यातील तरुणांना रिझर्व्ह बँक, ऑईल कंपन्या, हॉटेल, इंडियन एअरलाइन्समध्ये नोकऱ्या मिळवून दिल्या. समितीच्या कार्यकर्त्यांनी 1990 च्या निवडणुकीत शिवसेनचा प्रचार केला होता. त्यावेळच्या रणनितीचा फायदा शिवसेनेला 1995 च्या निवडणुकीत झाला आणि राज्यात पहिल्यांदाच शिवसेना-भाजप युतीची सत्ता आली.

भाजपपेक्षा शिवसेनेचे अधिक आमदार निवडून आले होते. त्यामुळे मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार हे निश्चित होतं. बाळासाहेबांनी मुंबईच्या महापौरपदासाठी मामा मनोहर जोशी यांच्याऐवजी भाच्चे सुधीरभाऊंना पसंती दिली होती. आता मुख्यमंत्रिपदही सुधीरभाऊंना मिळणार, असं कार्यकर्त्यांना वाटत होतं. पण परिस्थितीच अशी होती की बाळासाहेबांना वेगळा विचार करावा लागला.

शिवसेना - भाजप युतीचे 1995 मध्ये सर्वाधिक आमदार विजयी झाले, मात्र स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. शिवसेनेला 73 आणि भाजपला 65 जागा मिळाल्या होत्या. एकूण आकडा 138 झाला होता. बहुमतासाठी युतीला आणखी सात आमदारांची गरज होता. युतीला 13 अपक्षांनी पाठिंबा दिला होता. सुधीरभाऊ हे कट्टर शिवसैनिक होते. ते अपक्षांशी जमवून घेतील का, याबाबत शंका होती. मुंबईचे महापौरपद वगळता त्यांना प्रशानाचाही अनुभव नव्हता. याउलट मनोहर जोशी हे त्यापूर्वी दोनवेळा विधानसभेवर निवडून गेले होते. त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणूनही काम पाहिलं होतं. याबरोबरच मनोहर जोशी यांचे सर्व पक्षांमध्ये मित्र होते. मुख्यमंत्री कुणीही झाले तरी रिमोट मात्र बाळासाहेबांच्या हाती राहणार, हे निश्चित होतं. बाळासाहेबांनी एकेठिकाणी तसं बोलूनही दाखवलं होतं, असें सांगितलं जातं.

युतीच्या झेंड्याला अपक्षांचा दांडा किंवा अपक्षांच्या दांड्यावर युतीचा झेंडा, असं वाक्य त्यावेळी प्रचलित झालं होतं. असं सांगितलं जातं, की मुख्यमंत्री म्हणून भाजपला सुधीर जोशी नको होते. सुधीर जोशी हे राजकारण्यापेक्षा उत्तम प्रशासक होते. ते शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेते, शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवणाऱ्यांपैकी ते एक होते. मुख्यमंत्रिपदासाठी बाळासाहेबांच्या मनात सुधीर जोशीच होते, पण भाजपनं त्यांना पाठिंबा दिला नाही, असंही काहीजीणांचं मत आहे. मुंबई महापालिका चालवणं वेगळं आणि राज्य चालवणं वेगळं, ही बाब त्यावेळी चर्चेत आली होती. राज्य कसं चालवायचं हे मनोहर जोशींना माहित होतं. त्यामुळे मनोहर जोशींनी बाजी मारली. मुख्यमंत्रिपदाची माळ मामांच्या गळ्यात पडली. कुणी का असेना, पण जोशी मुख्यमंत्री झाले, यावर शिवसैनिकांनी समाधान मानून घेतलं.

'मामा नको, भाचा हवा'

मनोहर जोशी हे ज्येष्ठ असतानाही महापौरपदासाठी बाळासाहेबांनी सुधीर जोशी यांना पसंती दिली होती. दादर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जातो. 1990 मध्ये या मतदारसंघातून सुधीर जोशी यांना उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती, मात्र ती मनोहर जोशी यांना मिळाली. त्यामुळं शिवसैनिकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. 'मामा नको, भाचा हवा' अशी पत्रकं काही कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनावर चिकटवली होती. या सर्व घडामोडी पाहता मुख्यमंत्रिपद सुधीर जोशी यांना मिळणार, अशी शक्यता होती, मात्र स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे भाच्याची संधी हुकली आणि माळ मुत्सद्दी मामांच्या गळ्यात पडली होती.

...राजकारणातून बाजुला गेले

मामाच मुख्यमंत्री झाल्यामुळं सुधीर जोशी नाराज होण्याची शक्यता कमीच होती. झालंही तसंच. कट्टर शिवसैनिक, शिस्तबद्ध असलेल्या सुधीर जोशी यांना पाठिंबा दिलेल्या अपक्षांचे लाड पुरवणे शक्य झालं नसतं, ते त्यांच्या स्वभावातही बसलं नसतं. त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. त्यांना गृहमंत्रिपद मिळू शकले असते, मात्र त्यांनी महसूल खात्याला पसंती दिली. त्यादरम्यान त्यांना एका अपघाताला सामोरं जावं लागलं. त्यानंतर त्यांच्यावर शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली, स्थानिय लोकाधिकार समितीचं अध्यक्षपदी त्यांना सोडावं लागलं. विधान परिषद सदस्यत्वाचा कालावधी संपल्यानंतर सुधीर जोशी हे प्रकृती अस्वास्थ्यामुळं राजकारणातून दूर झाले. कोरोनामुळे 17 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांचं निधन झालं. त्याच्या दोन वर्षांनंतर मामा मनोहर जोशी यांचंही 23 फेब्रुवारी 2024 रोजी निधन झालं.

Manohar Joshi
Buddhadeb Bhattacharjee : अखेरपर्यंत 2 बीएचकेमध्ये राहिलेले मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य

बाळासाहेबांचा मनोहर जोशींना पाठींबा का?

अभ्यासू, सुसंस्कृत, नितीमान नेता अशी सुधीर जोशी यांची ओळख होती. महाराष्ट्र आणि मराठी माणसावर त्यांची निष्ठा होती. शिवसेना स्थापन झाली, त्यावेळी पहिल्या फळीतील पाच नेत्यांमध्ये सुधीर जोशी होते. शिवसैनिक त्यावेळी खूप आक्रमक होते. अशा काळात सुधीर जशी, मनोहर जोशी आणि प्रमोद नवलकर या उच्चशिक्षित नेत्यामुळे सुशिक्षित वर्गही शिवसेनेकडे आकृष्ट झाला. परप्रांतीयांच्या तुलनेत मराठी माणूस मागे पडू नये, याची काळजी सुधीर जोशी यांनी स्थानिय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून घेतली होती.

काळ बदलत गेला, तसं राजकारणही बदलत गेलं. सुधीर जोशी यांच्यासारखे नेमस्त राजकारणी मागे पडत गेले किंवा बाजूला तरी फेकले गेले. मामा आणि भाचा, दोघांसाठीही सत्तापदांपेक्षा पक्षनिष्ठा महत्वाची होती. मामा मुख्यमंत्री झाल्यामुळं भाच्यावर अन्याय झाला, असं म्हणता येणार नाही, कारण अपक्षांच्या पाठिंब्यावरील दोन पक्षांचे सरकार चालवताना लवचिकता लागते. पटत नसलं तरी सहकारी पक्षासोबत, पाठिंबा दिलेल्या अपक्षांसोबत जुळवून घ्यावं लागतं. आघाड्यांच्या सरकारांची चलती सुरू झाली तशी सुधीर जोशी यांच्यासारखे नेमस्त नेतृत्व मागं पडत गेलं. त्यांना 1999 मध्ये राजकारणातून बाजूला व्हावं लागलं, हा योगायोगच.

शिवसेनेचे नेते जितेंद्र शिंदे (उमरगा, जि. धाराशिव) सांगतात, की 1995 मध्ये सुधीरभाऊंना मुख्यमंत्री करावं, असं बाळासाहेबांना वाटत होतं, असं काहीजणांचं म्हणणं आहे, पण त्याआधीचा घटनाक्रम पाहिला तर, पूर्ण विचार करूनच बाळासाहेबांनी 1990 मध्ये मनोहर जोशी यांना विरोधी पक्षनेतेपदी संधी दिली होती. त्यावेळी छगन भुजबळ हे शिवसेनेचे ब्ल्यू आइड बॉय होते. तरीही बाळासाहेबांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी आपलं वजन मनोहर जोशी यांच्या पारड्यात टाकलं होतं. मनोहर जोशी हे धोरणी होते, त्यांची काम करण्याची पद्धत संतुलन साधणारी होती. पक्षीय राजकारण हाताळण्यासाठीची योग्यता त्यांच्या अंगी होती.

सुधीर जोशी आणि मनोहर जोशी या दोघांनाही जवळून पाहिलेले जितेंद्र शिंदे पुढे सांगतात, की सुधीर जोशी हे अभ्यासू होते, सभ्य होते. स्थानिय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून त्यांनी मोठं काम केलं होतं. पुढील म्हणजे 1995 च्या निवडणुकीत समितीच्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघनिहाय डेटा गोळा केला होता.

त्याचा मोठा फायदा झाल होता. सत्ता आल्यानंतर मंत्रिमंडळ स्थापनेमागं शरद पवार यांची एक व्यूहरचना होती. त्यामुळं साधं, सरळ व्यक्तिमत्व असलेल्या सुधार जोशी यांना मुख्यमंत्री करण्याचा विचार बाळासाहेबांच्या मनात होता, असं वाटत नाही. मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर सुधीरभाऊ यांनी कोणाचीही कामं अडवली नाहीत. सर्व पक्षांच्या आमदारांची कामं त्यांनी केली. ते कट्टर शिवसैनिक आहेत, असे कधी वाटले नाहीत. सुधीरभाऊ हे भाचे असूनही मनोहर जोशी यांच्याशी अत्यंत मोकळेपणानं, प्रसंगी एकेरी हाक मारून संवाद साधायचे. मनोहर जोशी त्यांना आदरानं बोलायचे. मामा-भाच्यांची बॉंडिंग, अंडरस्टँडिंग या पातळीची होती. त्यामुळं मनोहर जोशींना मुख्यमंत्रिपद मिळाल्यामुळे सुधार जोशी नाराज होणं शक्यच नव्हतं.

...तर सुधीरभाऊंची कसोटी लागली असती

मुख्यमंत्री होण्यासाठी मनोहर जोशीा यांना फार लॉबिंग करावी लागली, असं वाटलं नाही. मुख्यमंत्री कोण, याचा निर्णय बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन ठरवणार होते. मनोहर जोशी आणि प्रमोद महाजन यांचे संबंध अत्यंत चांगले होते. त्यामुळेही कदाचित मनोहर जोशी यांच्या नावाला पसंती मिळाली असेल. मनोहर जोशी विरोधी पक्षनेते होते. बाबरी मशीद प्रकरणानंतर शिवसेनेला राज्यभरातून प्रतिसाद वाढला. शिवसेनेच्या विस्ताराचा वेग वाढला. हे लक्षात आल्यानंतर मनोहर जोशी सक्रिय झाले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या कार्यकर्त्यांची कामे त्यांनी मार्गी लावली. ते सहज उपलब्ध व्हायचे. वैयक्तिक कामांसाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांनाही त्यांनी वेळ दिला. ते राज्याचं नेतृत्व करू शकतात, असा संदेश त्यावेळीच गेला होता. सुधीर जोशी मुख्यमंत्री झाले असते तर त्यांनी उत्तम प्रशासक म्हणून काम केलं असतं, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. युती आणि अपक्षांच्या पाठिंब्यावरील सरकार चालवण्यासाठी जी कसरत करावी लागते, ती सुधीरभाऊंसारख्या साध्या, सरळ नेत्याला शक्य झाली असती का, याबाबत शंकाच आहे, असेही जितेंद्र शिंदे सांगतात.

सुधीर जोशी म्हणजे साधा माणूस आणि मनोहर जोशी म्हणजे चतुर, आशी चर्चा त्यावेळी व्हायची. युती आणि अपक्षांच्या पाठिंब्यावरील सरकार चालवण्यासाठी मुख्यमंत्री चतुर असावा लागतो, हे ओघानंच आलं. मनोहर जोशी यांनी सर्व खाचखळग्यांची माहिती होती. ते यशस्वीपणे सरकार चालवतील, असं बाळासाहेबांना त्यांच्या जवळच्या लोकांनी सांगितलं होतं. नेता निवडीसाठी शिवसेना भवनात बैठक सुरू झाली तरी ठोस निर्णय झालेला नव्हता, असं सांगितलं जातं. बाहेर मात्र चर्चा होती ती सुधार जोशी यांचीच. बाळासाहेबांनी अखेर मनोहर जोशींनाच पसंती दिली. मामा मुख्यमंत्री झाले आणि मामांच्या मंत्रिमंडळात भाच्चे कॅबिनेट मंत्री बनले.

(Edited By Roshan More)

Manohar Joshi
Rajya Sabha by Election : राज्यसभा निवडणुकीत एनडीए की इंडिया, कुणाचं पारडं जड? असं आहे विजयाचं गणित...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com