

AAP MLA arrested in rape case: पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचा एक आमदार अखेर पोलिसांच्या ताब्यात आला असून बलात्कारासारख्या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सनौर मतदारसंघातून प्रथमच निवडून आलेले हरमीत सिंग पठानमाजरा हे मागील काही महिन्यांपासून फरार होते. अखेर त्यांना मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 सप्टेंबर 2025 रोजी सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात बलात्कार, फसवणूक आणि गुन्हेगारी धमकी यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.
झिरकपूर येथील एका महिलेच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. संबंधित महिलेने असा आरोप केला होता की, आमदारांनी स्वतःला घटस्फोटित असल्याचे सांगून तिच्याशी संबंध प्रस्थापित केले आणि 2021 मध्ये तिच्याशी विवाह केला, मात्र प्रत्यक्षात ते आधीपासून विवाहित होते.
या प्रकरणानंतर 2 सप्टेंबरपासून ते फरार असल्याचे सांगितले जाते. पंजाब पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी हरियाणातील करनाल येथे छापा टाकला होता. त्या वेळी ते एका नातेवाईकाच्या घरी थांबले होते. मात्र, कारवाईदरम्यान त्यांच्या समर्थकांनी गोंधळ घालत दगडफेक आणि गोळीबार केल्याचा दावा पोलिसांनी केला होता. त्यानंतर पठानमाजरा तिथून पसार झाले.
सध्या सर्व आरोपींना ताब्यात घेऊन पटियालाला आणण्यात आले असून त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलिस त्यांचा रिमांड घेऊन अधिक चौकशी करण्याच्या तयारीत आहेत. या प्रकरणातील इतर पैलूंवरही सखोल तपास केला जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.