
Delhi Election Update : दिल्लीची सत्ता काबीज केल्यानंतर पुन्हा एकदा देशाच्या राजधानीत मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर खच्चीकरण झालेल्या आम आदमी पक्षाच्या हातून आता दिल्ली महापालिकाही जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यापाठोपाठ महापालिकेतही कमळ फुलणार असल्याने भाजपसाठी ‘सोने पे सुहागा’ अशी स्थिती झाली आहे.
दिल्ली महापालिकेच्या महापौरपदासाठी 25 एप्रिलला मतदान आहे. त्यासाठी अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. ही निवडणूकच न लढण्याचा निर्णय आपने घेतल्याने भाजपला एकप्रकारे बाय मिळाला आहे. आपच्या नेत्या व माजी मुख्यमंत्री आतिशी यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे महापालिकेतील आपची सत्ताही जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आतिशी यांच्यासह सौरभ भारद्वाज यांनी सोमवारी मीडियाशी बोलताना सांगितले की, पक्षाच्या नगरसेवकांना घाबरवून, धमकावून आणि अमिष दाखवून भाजप आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे या निवडणुकीत उमेदवार न उतरवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही अडथळ्यांशिवाय भाजपने महापौर बनवावा आणि कोणतेही कारण न देता दिल्लीकरांना काम करून दाखवावे, असेही भारद्वाज म्हणाले.
दिल्लीतील महापौरपदाची निवडणूक आता बिनविरोध होणार असून भाजपची सत्ता येणार आहे. काही महिन्यांपूर्वीच भाजपने विधानसभेच्या निवडणुकीत विजय मिळवत 23 वर्षानंतर सत्ता काबीज केली आहे. रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली सरकारने वेगात काम सुरू केले असून आता महापालिकेवरही सत्ता येणार आहे. विधानसभा निवडणुकीतील विजयामुळे महापालिकेतील नंबरगेम बदलला आहे.
आपने निवडणुकीत उमेदवार उतरवला असता तरी भाजपचा विजय निश्चित मानला जात होता. दिल्ली महापालिकेत एकूण 238 नगरसेवक आहेत. लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार, नामनिर्देशित आमदार जोडले तर हा आकडा 262 वर पोहचतो. त्यामुळे महापौर पदासाठी बहुमताचा आकडा 132 आहे. सध्या भाजपकडे 117 नगरसेवक असून सात लोकसभा सदस्य तसेच 11 नामनिर्देशित आमदार आहेत. मतदान करू शकणाऱ्या एकूण सदस्यांची संख्या 135 होते. बहुमताच्या आकड्यापेक्षा भाजपकडे तीन सदस्य अधिक होतात. त्यामुळे निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा विजय निश्चित मानला जात होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.