Telangana News : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडून सातत्याने उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर निशाणा साधला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानींमधील घनिष्ठ मैत्रीवरून अनेकदा आरोप केले आहेत. संसद असो की प्रचारसभा प्रत्येक ठिकाणी काँग्रेसकडून अदानींना लक्ष्य केले जाते. पण त्याच अदानींसोबत काँग्रेसच्या सरकारने कोट्यवधी रुपयांचे करार केले आहेत.
दावोसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत अदानी ग्रुपने (Adani Group) तेलंगणामध्ये पुढील काही वर्षांत 12 हजार 400 कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले. तेलंगणामध्ये (Telangana) काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसची (Congress) सत्ता आली आहे. अदानी ग्रीन एनर्जीकडून सुमारे पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे, तर अदानी कोनेक्स डाटा सेंटरची उभारणीही या राज्यात केली जाणार आहे. (World Economic Forum in Davos)
अदानी उद्योगसमूहातील अंबुजा सिमेंट कंपनीकडूनही चौदाशे कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. तेलंगणात ड्रोन सिस्टीम आणि मिसाईल डेव्हलपमेंट प्रोजेक्टसाठी अदानीसमूह प्रयत्नशील आहे. राज्याचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी (Revanth Reddy) आणि गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यामध्ये दावोस येथे झालेल्या चर्चेनंतर गुंतवणुकीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राहुल गांधी यांनी तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्येही मोदी-अदानी यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर केसीआर यांची सत्ता उलथवून टाकण्यात काँग्रेसला यशही मिळाले. आता काँग्रेस सरकारने अदानी उद्योगसमूहाला जवळ केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान, काँग्रेसमधून नुकतेच बाहेर पडत शिवसेनेत प्रवेश केलेल माजी खासदार मिलिंद देवरा यांनीही नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसकडून उद्योगपतींना टार्गेट केले जात असल्याचे विधान त्यांनी केले होते. देवरा यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी पाठिंबा दिला होता. पण त्यानंतरही त्यांचा पराभव झाला होता. विशेष म्हणजे देवरा हे राहुल टीममधील आहेत. राहुल गांधींकडून अंबानींनाही टार्गेट केले जाते.
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.