

New Delhi News: एकीकडे जागतिक पातळीवर अमेरिका-इस्त्रायल-इराण यांच्यात तब्बल 18 दिवसांपासून युद्ध पेटलं आहे. याचदरम्यान, दुसरीकडे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातला वादही चिघळला आहे. पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर सातत्यानं हल्ले चढवले जात आहेत. पाकिस्ताननं सोमवारी (ता.16) मध्यरात्री अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये रुग्णालयावर केलेल्या भीषण एअर स्ट्राईकमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या हवाई हल्ल्यात तब्बल 400 जणांचा मृत्यू झाला आहे. ऐन रमजानच्या पवित्र महिन्यात झालेल्या या हल्ल्यानंतर भारतही हळहळला असून पाकिस्तानचा तीव्र शब्दात फटकारलं आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं सोशल मीडियावरील एक्स प्लॅट फॉर्मवर पोस्ट शेअर करत पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यावर तीव्र शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली आहे. सामान्य नागरिकांना लक्ष्य करणारे हे भ्याड आणि अक्षम्य कृत्य असल्याची टिप्पणी केली आहे.
परराष्ट्र मंत्रालयानं एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये काबूलमधील ओमिद व्यसनमुक्ती उपचार रुग्णालयावर पाकिस्तानने केलेल्या अमानुष हवाई हल्ल्याचा आम्ही निषेध करत असल्याचं म्हटलं आहे. तसेच हे एक भ्याड आणि अमानवीय हिंसक कृत्य असल्याचं सांगत पाकिस्तानचे चांगलेच वाभाडे काढले आहेत.
याचवेळी भारतानं पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यामुळे शेकडो निरपराध लोकांचा बळी गेला असून “लष्करी कारवाई म्हणून या कृत्याला कोणत्याही परिस्थितीत समर्थन देता येणार नसल्याचं स्पष्ट भूमिका मांडली आहे. पाकिस्तान आता या हत्याकांडाला लष्करी कारवाईचं स्वरूप देण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपही भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानवर केला आहे.
भारतानं हे पाकिस्तानचे घृणास्पद आणि आक्रमक कृत्य अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावरील एक उघड हल्ला आहे, अशा स्पष्ट शब्दांत सुनावलं आहे. याचवेळी परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानचा हा हवाई हल्ला म्हणजे प्रादेशिक शांतता व स्थिरतेला थेट धोका असल्याचा दावा केला आहे.
भारतानं पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर ऐन रमजानच्या महिन्यात केलेल्या एअर स्ट्राईकमुळे सडकून टीका केली आहे. यावेळी भारतानं जगभरातील मुस्लिम समुदायासाठी हा महिना शांतता, चिंतन आणि दयेचा काळ असल्याचेमानले जाते. रमजानच्या पवित्र महिन्यात हा हल्ला झाल्यामुळे ही बाब या कृत्याला अधिकच निंदनीय बनवत असल्याचं म्हटलं आहे. तसेच कोणताही धर्म, कायदा आणि नैतिकता रुग्णालय वा तेथील रुग्णांना हेतुपुरस्सर लक्ष्य करण्याचं समर्थन करू शकत नसल्याचं आपल्या निवेदनात परराष्ट्र मंत्रालयाने रोखठोक भूमिका मांडली आहे.
परराष्ट्र मंत्रालयानं आपल्या पोस्टमध्ये भारत नेहमीच अफगाणिस्तानच्या लोकांसोबत खंबीरपणे उभा आहे. अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेसाठी भारताचे नेहमीच समर्थन करत असल्याची भूमिका घेतली आहे. तसेच यावेळी भारतानं आंतरराष्ट्रीय समुदायानं हे गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांना जबाबदार धरले पाहिजे.
पाकिस्तानकडून अफगाणिस्तानातील नागरिकांना लक्ष्य करण्याची ही निष्कारण मोहीम लवकरात लवकर थांबेल, यासाठी प्रयत्न करायला हवे अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. या हल्ल्यात बळी पडलेल्या शोकाकुल कुटुंबांप्रति भारत शोकसंवेदना व्यक्त करतो. जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे, या सदिच्छा व्यक्त करतो.
पाकिस्ताननं केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये काबूल येथील एक व्यसनमुक्ती केंद्र उद्धवस्त झालं आहे. यात 400 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 250 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. पण या हवाई हल्ल्याबाबतचे आरोप पाकिस्ताने फेटाळले आहे. यावर पाकिस्तानचे PMO कार्यालयाचे प्रवक्ते मोशर्रफ जैदी यांनी अफगाणिस्तानकडून करण्यात आलेले हल्ल्याबाबतचे सर्व आरोप निराधार आणि बिनबुडाचे आहेत, असल्याचा दावा केला आहे, आम्ही कोणत्याही मानवी वस्तीवर हल्ला केला नसल्याचं पाकिस्ताननं सांगितलं आहे.