इंदोर : अध्यात्मिक गुरू भय्यू महाराज (Bhaiyyu Maharaj) यांच्या आत्महत्या प्रकरणात न्यायालयाने तिघांना दोषी धरत प्रत्येक सहा वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे आता समोर आले असून, त्यांची शिष्या पलक पुराणिकने (Palak Puranik) धमकीचा फोन केल्यानंतर भय्यू महाराजांनी दुसऱ्याच दिवशी आत्महत्या केली होती. या प्रकरणातील मास्टरमाईंट असलेल्या पलकने महाराजांना दाती महाराज बनवण्याची धमकी दिली होती.
या प्रकरणात पलक पुराणिक ही मास्टरमाईंड असल्याचे समोर आले आहे. पलक ही महाराजांची केअरटेकर होती. तिला दरमहा दीड लाख रुपये पगार मिळत असे. हा पगार वाढवून अडीच लाख रुपये करावा, यासाठी ती महाराजांवर दबाव आणत होती. तिने महाराजांना ११ जून २०१८ रोजी फोन करुन धमकी दिली होती. माझ्यासोबत १६ जून २०१८ रोजी लग्न करावेच लागेल, अन्यथा तुम्हाला दाती महाराज बनवेन, अशी धमकी तिने दिले होती. पलकने धमकी दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी १२ जून २०१८ रोजी महाराजांनी आत्महत्या केली होती. (Bhaiyyu Maharaj News)
दरम्यान, त्यावेळी दाती महाराजांचे बलात्काराचे प्रकरण समोर आले होते. दाती महाराजांप्रमाणे तुमची बदनामी करेन, अशी धमकी पलकने दिली होती. दाती महाराजांप्रमाणे घाबरून पळून जावे लागेल, असेही तिने म्हटले होते. याचबरोबर माध्यमांना बोलावून त्यांच्यासमोर बदनामी करण्याची धमकीही ती वारंवार देत होती. अशा प्रकारे ब्लॅकमेल करुन ती पैसे उकळत होती. तिने या कामासाठी महाराजांचा मुख्य सेवादार शरद आणि चालक विनायक यांना हाताशी धरले होते. ते महाराजांना झोपेच्या गोळ्या देत असत. भय्यू महाराजांनी एकदा त्यांच्या मोठ्या बहिणीला आपण या प्रकरणात फसल्याचे सांगितले होते.
हा प्रकार महाराजांची दुसरी पत्नी आयुषी शर्मा यांना माहिती झाला होता. त्यांनी महाराजांना पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला. परंतु, प्रतिष्ठा जपण्यासाठी त्यांनी पोलिसांकडे जाण्याचे टाळले. मी सार्वजनिक जीवनात असून, अनेक लोकांची आस्था माझ्याशी जोडलेली आहे. माझे अनेक शिष्य आहेत. ही मुलगी मला वारंवार धमक्या देत असून, मी आता थकून गेलो आहे. आता माझी क्षमता राहिलेली नाही. मला तुरुंगात जाण्याची इच्छा नाही, असे महाराजांनी पत्नीला सांगितले होते.
भय्यू महाराज यांनी स्वत:च्या रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून घेत 12 जून 2018 रोजी आत्महत्या केली होती. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. यानंतर सहाच महिन्यांत मुख्य सेवादार विनायक दुधाळे (Vinayak Dudhale), चालक, शरद देशमुख (Sharad Deshmukh) आणि शिष्या पलक पुराणिक यांना अटक झाली होती. तिघांना जानेवारी 2019 मध्ये अटक करण्यात आली होती. भय्यू महाराजांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा ठपका पलकसह तिघांवर ठेवण्यात आला होता. आरोपींकडून त्यांना पैशांसाठी धमकावले जात होते, असेही न्यायालयात सिध्द झाले. त्यामुळे आयपीसी कलम 306 नुसार तिघांना दोषी धरत प्रत्येकी सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. (Bhaiyyu Maharaj Suicide Case Updates)
या प्रकरणात न्यायालयात 32 साक्षीदार सादर करण्यात आले. इंदोर येथील सत्र न्यायाधीश धर्मेंद्र सोनी यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. तिघांना अटक केल्यानंतर या प्रकरणाचा पर्दाफाश झाला होता. तिघे मिळून भय्यू महाराजांचे आर्थिक आणि मानसिक शोषण करत होते. त्यांनी सुसाईड नोटमध्ये विनायकचा उल्लेख केला होता. कारण विनायक हा त्यांचा 16 वर्षांपासूनचा सेवक होता. आत्महत्येनंतर त्यांचे मुलगी कुहू आणि दुसरी पत्नी आयुषी यांच्यातील वादही समोर आला होता. पण त्यानंतर झालेल्या तपासात या तिघांची नावे समोर आली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.