
Ajit Pawar's Political Influence in Northeast Under Threat : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांना महाराष्ट्राबाहेर सर्वात मोठा झटका बसला आहे. नागालँडमधील पक्षाच्या सर्व सात आमदारांनी शनिवारी सोडचिठ्ठी दिली आहे. या सर्व आमदारांनी सत्ताधारी नॅशनलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्राबाहेर याच राज्यात राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार होते. आता मात्र पक्षाला पुन्हा राष्ट्रीय दर्जा मिळविण्याच्या प्रयत्नांनाही यामुळे हादरा बसला आहे.
नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांच्या उपस्थितीत सात आमदारांनी NDPP प्रवेश केला. त्यामुळे 60 सदस्यीय विधानसभेत सरकारला पूर्ण बहुमत मिळाले आहे. त्यांच्या पक्षाच्या आमदारांची संख्या आता 25 वरून 32 वर पोहचली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर नागालँडमधील पक्ष संघटनेने अजित पवारांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला होता.
वर्ष 2023 मध्ये नागालँड विधानसभा निवडणुकीत एनडीपीपी आणि मित्रपक्ष भाजपनंतर एनसीपी सर्वात मोठा पक्ष ठरला होता. आता मात्र, पक्षाकडून एकही आमदार उरलेला नाही. विधानसभेचे अध्यक्ष शारिंगैन लोंगकुमेर यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, सर्व सात आमदारांनी स्वत: उपस्थित राहून एनडीपीपीमध्ये पक्षाचा गट विलीन होत असल्याच्या निर्णयाचे पत्र दिले. संविधानातील दहाव्या परिशिष्टानुसार हे विलीनीकरण योग्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नागालँड सरकारमधील मंत्री के. जी. केन्ये यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, सायंकाळी 7 वाजता एनसीपीच्या सात आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना विलीनीकरणाबाबतचे पत्र दिले. हे पत्र अध्यक्षांनी स्वीकारले आहे. त्यामुळे 14 व्या विधानसभेत एनडीपीपीची सदस्य संख्या 25 वरून 32 वर गेली आहे. त्यामुळे आमचे मुख्यमंत्री आणि सरकारच्या कारभाराला मजबूती येणार आहे.
दरम्यान, नागालँड विधानसभेत आता एनडीपीपी 32 आमदारांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या पक्षाला स्वबळावरून बहुमत मिळाल्याने त्यांना सत्तेसाठी कोणत्याही पक्षाची गरज भासणार नाही. मात्र, सध्या त्यांच्यासोबत भाजपचे 12 आमदारही आहेत. त्याचप्रमाणे विधानसभेत एनपीपीचे पाच, लोकजनशक्ती पक्ष, नागा पीपल्स फ्रंट आणि रिपब्लिकन पक्षाचे प्रत्येकी दोन तर संयुक्त जनता दलाचे एक आमदार आहेत. तसेच चार अपक्ष आमदारही आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.