
New Delhi News : दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने मोठी खेळी खेळली आहे. मुख्यमंत्री आतिशी यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसने फायरब्रँड नेत्या अलका लांबा यांना रिंगणात उतरवले आहे. त्यांच्या उमेदवारीची शुक्रवारी अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आतिशी यांना निवडणूक सोपी नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
काँग्रेसने शुक्रवारी आणखी एक उमेदवारी यादी जाहीर केली. यामध्ये कालकाजी मतदारसंघातून अलका लांबा यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. हा मतदारसंघ आपच्या नेत्या व मुख्यमंत्री अतिशी यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून भाजपकडून माजी खासदार रमेश बिधूडी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. परिणामी, तिन्ही उमेदवारी दिग्गज असल्याने या मतदारसंघातील निवडणूक चुरशीची होणार, हे स्पष्ट आहे.
काँग्रेसने आतापर्यंत 48 उमेदवार जाहीर केले असून अनेक दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवले आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात माजी खासदार संदीप दीक्षित यांना तिकीट देण्यात आले आहे. तर माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसने फरहाद सूरी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
अलका लांबा यांनी 2015 आणि 2020 मध्ये चांदणी चौक मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. यावेळी काँग्रेसने या मतदारसंघातून माजी खासदार जे. पी. अग्रवाल यांचे पुत्र मुदित अग्रवाल यांना उमेदवारी दिली आहे. लांबा यांनी 2015 ची निवडणूक आप च्या तिकीटावल लढवत विजय मिळवला होता. तर 2020 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर त्या पराभूत झाल्या होत्या.
अलका लांबा यांनी दिल्ली विद्यापीठात विद्यार्थी नेता म्हणून राजकारणात प्रवेश केला. 2003 मध्ये त्यांनी भाजप नेते मदनलाल खुराना यांच्याविरोधात काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, पण त्यांना चांगलीच प्रसिध्दी मिळाली होती.
जवळपास 20 वर्षे काँग्रेसमध्ये घालवल्यानंतर त्यांनी 2014 मध्ये पक्षाला सोडचिठ्ठी देत आपमध्ये प्रवेश केला होता. पुन्हा 2019 मध्ये आपमधून बाहेर पडल्यानंतर त्यांची घरवापसी झाली होती. सध्या त्या राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष असून पक्षाचा आक्रमक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.