
New Delhi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचे रणशिंग फुंकले. दिल्लीत विविध विकासकामांचे लोकार्पण करताना त्यांनी आम आदमी पक्षावर सडकून टीका केली. तसेच माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे नाव न घेता त्यांच्या सरकारी निवासस्थानाचाही उल्लेख केला. दिल्ली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींनी पहिल्याच सभेत ‘शीशमहल’चा उल्लेख करत केजरीवालांना लक्ष्य केले.
दिल्लीत आज पंतप्रधान मोदींनी आम आदमी पक्षाचा उल्लेख ‘आप-दा’ (आपत्ती) असा केला. रोहिणी भागातील जापानी पार्कमध्ये झालेल्या सभेत ते म्हणाले, दिल्लीत केंद्र सरकार अनेक कामे करत आहे. पण येथील आपदा सरकारवर ज्या कामांची जबाबदारी आहे, त्यालाही ब्रेक लागला आहे. दिल्लीला या आपत्तीने घेतले आहे. त्यांच्याकडे कसलेही व्हिजन नाही.
केजरीवाल मुख्यमंत्री असताना भाजपने त्यांच्या निवासस्थानाचा उल्लेख शीशमहल असा केला होता. कोट्यवधी रुपये या घरासाठी खर्च केल्याचा आरोप भाजपने केला होता. पंतप्रधानांनी केजरीवालांचे नाव न घेता शीशमहलवरून टोला लगावला. मी कधीही स्वत:साठी घर बनवले नाही. पण मागील दहा वर्षांत चार कोटी गरीब लोकांच्या घराचे स्वप्न पूर्ण केले आहे. मीही शीशमहल बनवू शकलो असतो. पण माझ्यासाठी देशातील लोकांना घर मिळावे, हेच स्वप्न होते.
मागील दहा वर्षांत दिल्ली एका ‘आप-दा’ने घेरली गेली आहे. अण्णा हजारेंना पुढे करत काही लोकांनी दिल्लीला ‘आप-दा’ मध्ये ढकलले आहे. दिल्लीतील लोकांनी आता ‘आप-दा’ विरोधात युध्द पुकारले आहे. दिल्लीतील मतदारांनी या ‘आप-दा’तून मुक्त होण्याचा निश्चय केला आहे. ‘आप-दा’ सहन करणार नाही, बदलून टाकणार, असे दिल्लीकर म्हणत असल्याचे मोदींनी सांगितले.
मद्य घोटाळा, मुलांच्या शिक्षणात घोटाळा, गरिबांच्या उपचारांमध्ये घोटाळा, भरतीच्या नावाखाली घोटाळा केल्याची टीकाही मोदींनी केली. हे लोक दिल्लीच्या विकासाच्या गप्पा मारत होते. पण एक आपत्ती बनून ते दिल्लीवर तुटून पडले आहेत. मी दिल्लीकरांना मोफत उपचारांची सुविधा देणाऱ्या आयुष्यमान भारत योजनेचा फायदा देऊ इच्छितो. पण आपत्ती सरकार दिल्लीत ही योजना लागू करत नाही, असा निशाणाही मोदींनी साधला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.