
Rajya Sabha Session : वक्फ सुधारित विधेयकावरून लोकसभेत बुधवारी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. दोन्ही बाजूच्या सदस्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. यावेळी भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसवर टीका करताना राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचेही नाव घेतले. त्यावरून आता वाद निर्माण झाला आहे.
ठाकूर यांनी लोकसभेत बोलताना कर्नाटकात वक्फ बोर्डाने अनेक जमिनी लाटल्याचे सांगितले. यामध्ये काँग्रेसच्या अनेक नेत्यांची नावे असून त्यात मल्लिकार्जून खर्गेही आहेत, असा गंभीर आरोप ठाकूर यांनी केला होता. त्यानंतर लगेचच काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल यांनी लोकसभेतच त्याचे खंडन करत ठाकुरांवर पलटवार केला.
राज्यसभेतही गुरूवारी याचे पडसाद उमटले. सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर खर्गेंनी अत्यंत नाराजीच्या सुरात ठाकूरांच्या विधानाचा समाचार घेतला. ते म्हणाले, राज्यसभेतील विरोधी पक्षनेता आणि काँग्रेस अध्यक्ष म्हणून मला अनुराग ठाकूर यांनी केलेल्या आरोपांचा निषेध करत आहे. ठाकूर माझ्याविरोधातील आरोप सिध्द करू शकत नसतील तर त्यांना संसदेत राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी राजीनामा द्यायला हवा.
पुरावे दिले तर मी राजीनामा देतो, असे आव्हान देत खर्गे म्हणाले, एक एकर जागा मी किंवा माझ्या मुलांनी घेतली असेल ते पुरावे द्यावेत. मी अशा गोष्टींना घाबरत नाही. मी एका मजुराचा मुलगा आहे. मी मजुरांचा नेता होता. त्यानंतर ब्लॉक काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष झालो आणि आता काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. माझ्या आयुष्यात असेंब्लीमध्येही माझ्याकडे बोट दाखवून कुणी बोलू शकले नाही, असेही खर्गेंनी सांगितले.
एकदा एकजण माझ्याविषयी काहीतरी बोलले, त्यानंतर संपूर्ण सभागृहाने माफी मागितली. मुख्यमंत्री माझ्याशेजारी येऊन बसले आणि माफी मागितली होती. मी असा व्यक्ती आहे. भाजपचे लोक मला घाबरवून झुकवण्याचा प्रयत्न करत असतील, पण कधीही झुकणार नाही. मी तुटेन पण झुकणार नाही. अनुराग ठाकूर यांनी माफी मागायला हवी, सभागृह नेत्यांनी त्यांच्यावतीने माफी मागायला हवी, अशी मागणी खर्गेंनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.