Jammu And Kashmir News : लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत हरियाणात भाजप बहुमतात सत्तेत आलं.तर जम्मू आणि काश्मीरमध्ये पूर्ण ताकद पणाला लावूनही भाजपला सत्ता मिळवता आली नव्हती. तिथे नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेस आघाडीने बहुमताचा आकडा गाठत पुन्हा सत्ता काबीज केली. हा पराभव जिव्हारी लागलेला असतानाच जम्मू आणि काश्मीर विधानसभेच्या पहिलंच अधिवेशन वादळी ठरलं आहे.
जम्मू आणि काश्मीरमध्ये सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स- काँग्रेस आघाडी व भाजपमध्ये नवा वाद पेटला आहे. मोदी सरकारने (Modi Government) आपल्या दुसर्या टर्ममध्ये घेतलेल्या जम्मू काश्मीरमधील कलम 370 अधिवेशनाच्या तिसऱ्याच दिवशी पुन्हा कायम करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. हा निर्णय घेत नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेस आघाडीने हा एकप्रकारे मोदी सरकारला इशाराच दिला आहे.
केंद्रातील मोदी सरकारने धाडसी निर्णय घेत जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 हटवलं होतं. या निर्णयाला विरोधी पक्षातील काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स यांच्यासह फुटीरतावाद्यांनी कडाडून विरोध केला होता. तरीदेखील मोदी सरकारने या विरोधाला न जुमानता कलम 370 हटवून दाखवलं होतं. आता पुन्हा एकदा कलम 370 चर्चेत आलं आले आहे.
आता परत भाजप आणि नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडी आणि भाजप एकमेकांना भिडले आहेत. जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभेत मोदी सरकारने हटवलेले कलम 370 पुन्हा कायम करण्यासाठी सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडी सरकारने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.
भाजपच्या तीव्र विरोधानंतरही उपमुख्यमंत्री सुरिंदर कुमार चौधरी यांनी जम्मू आणि काश्मीर विधानसभा सभागृहात कलम 370 पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव मांडला. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी त्याला समर्थन दिल्यानंतर भाजप आमदार संतप्त झाले.
त्यांनी सत्ताधारी पक्षाविरोधात जोरदार घोषणाबाजी तर केलीच, शिवाय या प्रस्तावाच्या प्रतीही फाडल्या. त्याच पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरच्या विधानसभा सभागृहात बुधवारी (ता.6) मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं.
नॅशनल कॉन्फरन्स पक्षाने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात कलम 370 पुन्हा लागू करण्याचं आश्वासन जनतेला दिलं होतं. म्हणून जम्मू आणि काश्मीर विधानसभेत हा प्रस्ताव मंजूर करुन तेथील नागरिकांना जाहीरनाम्यात दिलेलं वचन पूर्ण केल्याचा दावा करण्यासाठीच हा खटाटोप सुरु असल्याचा आरोपही विरोधी पक्षाच्या आमदारांनी केला आहे.
भाजप आमदारांनी यावेळी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी विरोधी पक्षाच्या आमदारांनी 370 कलम कायम करण्याचा प्रस्ताव म्हणजे अब्दुल्ला परिवार आणि सत्ताधारी पक्ष लोकांना भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल करण्यासाठीच असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.
जम्मू आणि काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेस आघाडीने बहुमताच आकडा गाठत राज्यात पुन्हा सत्ता काबीज केली. ओमर अब्दुल्ला हे जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री बनले आहेत. भाजपची सत्ता आली नसली तर पक्षाला मिळालेले मते इतर पक्षांपेक्षा जास्त आहेत. या निवडणुकीत भाजपला 25.64 तर नॅशनल कॉन्फरन्सला 23.43 टक्के मते मिळाली आहेत.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत भाजपला 29 जागांवर समाधान मानावे लागले. या सर्व जागा जम्मू विभागात मिळाल्या आहेत. काश्मीर विभागात पक्षासह इतर अपक्ष व पक्षांना अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत, त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.