Bihar News : मध्य प्रदेशमध्ये यादव समाजातील मोहन यादव यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पण त्यांना हा मान मिळण्यामागे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा मास्टरस्ट्रोक असल्याचे वक्तव्य संयुक्त जनता दलाचे राष्ट्रीय प्रवक्ते के. सी. त्यागी यांनी केला आहे. बिहारमध्ये करण्यात आलेल्या जातनिहाय जनगणनेमुळे भाजपला मुख्यमंत्री ठरवताना रणनीती बदलावी लागल्याचा दावा त्यागी यांनी केला आहे.
त्यागी यांनी माध्यमांशी बोलताना हे विधान केले आहे. भाजपने (BJP) मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व विधानसभा अध्यक्षांची घोषणा झाल्यानंतर जातीय गणित साधण्यासाठी मोठी कसरत केल्याचे दिसून येते. यापार्श्वभूमीवर त्यागी यांनी बिहारमधील (Bihar) जातनिहाय जनगणनेचा हवाला दिला आहे. बिहारमध्ये काही दिवसांपुर्वीच जातनिहाय जनगणना करून त्यानुसार आरक्षण (Reservation) कोटा वाढविण्यात आला आहे.
बिहारमध्ये जातनिहाय सर्वेक्षणानंतर आरक्षण वाढविण्यात आल्याने नितीश कुमार यांची लोकप्रियता वाढल्याचे सांगत त्यागी म्हणाले, ‘या सर्वेक्षणामुळे भाजपला मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये आपली रणनीती बदलावी लागली आहे. मोहन यादव यांना मुख्यमंत्री करत भाजपने यादव समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.’ नव्या सर्वेक्षणानुसार, बिहारमध्ये १४ टक्के यादव समाज असून आगामी निवडणुकीत या समाजाची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार लवकरच उत्तर प्रदेश आणि झारखंडचा दौरा करणार आहेत. तिथे सभाही घेणार असल्याचे त्यागी यांनी सांगितले. शिवाय ते मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थानमध्येही जाणार आहेत. काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत तीन राज्यांत नितीश कुमार यांची मदत घेतली असती तर परिणाम वेगळे दिसले असते, असा टोलाही त्यागी यांनी काँग्रेसला लगावला.
(Edited By - Rajanand More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.