
Prashant Kishor Quits Bihar Election : बिहार विधानसभा निवडणुकीला अवघा एक महिना उरला असतानाच आता एक मोठी घडामोड घडली आहे. ती म्हणजे बिहारमध्ये सत्ता परिवर्तन करण्याच्या निर्धाराने निवडणुकीच्या मैदानात उतरलेले राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.
यंदाच्या बिहार विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडी आणि भाजप प्रणिक एनडीए आघाडीला आव्हान देण्यासाठी प्रशांत किशोर मैदानात उतरले होते. ते आपल्या जनसुराज्य पक्षाकडून निवडणूक लढवणार होते. यासाठी त्यांनी बिहारमध्ये तशी वातावरण निर्मिती केली होती.
मात्र, आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. तर मी आमच्या पक्षाने घेतलेल्या निर्णयानुसारच निवडणुकीला उभा राहणार नाही, त्याऐवजी मी पक्षातील इतर उमेदवारांचा प्रचार करणार असल्याची माहिती प्रशांत किशोर यांनी माध्यमांशी बोलताना दिले.
ते म्हणाले, 'मी जर स्वतः निवडणुकीला उभा राहिलो तर पक्षाच्या प्रचाराकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षसंघटनेच्या कामाला फटका बसेल. त्यामुळे पक्षहितासाठी मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.'
त्यांच्या या निर्णयामुळे आता राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्याविरोधात राघोपूर विधानसभा मतदारसंघातून स्थानिक व्यावसायिक चंचल सिंह यांना जन सुराज पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, प्रशांत किशोर यांनी बिहारच्या निवडणुकीत आमच्या पक्षाचा एकतर बहुमताने विजय होईल किंवा पक्षाचा सपशेल पराभव होईल, असा दावा केला आहे.
ते म्हणाले, 'मी आजपर्यंत अतिशय विश्वासाने आणि खात्रीने सांगतोय की एकतर माझ्या पक्षाला 150 हून अधिक जागा मिळतील नाहीतर दहापेक्षाही कमी जागा मिळतील. या दोन्हीपेक्षा वेगळं काही होण्याची शक्यता नाही.
तसंच यावेळी त्यांनी नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाची परिस्थिती बिकट झाली असून त्यांना 25 जागा जिंकण्यासाठीही संघर्ष करावा लागेल आणि ते पुन्हा मुख्यमंत्री होणे अवघड झालं असल्याचा दावा केला आहे. शिवाय एनडीएमध्ये गोंधळाची परिस्थिती असून भाजप आणि जेडीयू या दोन्ही पक्षांचं अद्याप कोणत्या जागा लढवायच्या हे ठरलं नसल्याचंही ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.