

Bihar Political News : विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर बिहारच्या राजकारणात पहिल्यांदाच मोठी खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. केवळ दोन महिन्यांतच NDA मध्ये धुसफूस सुरू झाली असून विरोधकांनाही मोठा हादरा बसणार असल्याचे वृत्त आहे. सरकारमधील भाजप आणि संयुक्त जनता दलामध्ये वर्चस्वाची लढाई सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत.
बिहारमध्ये दोन महिन्यांपूर्वीच झालेल्या निवडणुकीत एनडीएने ऐतिहासिक विजय मिळवत पुन्हा सत्ता काबीज केली. नितीन कुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या निवडणुकीत भाजप ८९ आमदारांसह सर्वात मोठा पक्ष ठरला. तर नितीश कुमार यांच्या जेडीयूने ८५ जागांवर विजय मिळवत आपली ताकद दाखवून दिली. आता नितीश कुमार राज्यात आपणच मोठा भाऊ असल्याचे दाखविण्यासाठी राजकीय फासे टाकत असल्याची चर्चा आहे.
नितीश कुमार यांच्याकडून पहिला झटका काँग्रेसला दिला जाईल, अशी चर्चा आहे. काँग्रेसचे या निवडणुकीत निवडून आलेले सर्व सहा आमदार त्यांच्या संपर्कात आहेत. या आमदारांनी पक्षांतर केले तर काँग्रेस बिहारच्या इतिहासात पहिल्यांदाच शुन्यावर येईल. तर नितीश कुमारांच्या आमदारांची संख्या ९१ वर जाईल. हा आकडा भाजपपेक्षा दोनने अधिक असेल.
मागील काही दिवसांपासून काँग्रेसचे आमदार पक्षाच्या काही कार्यक्रमांमध्ये अनुपस्थित असल्याने या चर्चा सुरू झाल्या आहेत. पक्षातील नेत्यांनी मात्र या चर्चा फेटाळून लावत अफवा असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे भाजपनेही आपली ताकद वाढविण्यासाठी मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय लोक मोर्चाच्या तीन आमदारांना पक्षात घेण्याची तयारी केल्याचे समजते.
उपेंद्र कुशवाह यांच्या पक्षातील तीन आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. या पक्षाचे विधानसभेत चार आमदार आहे. त्यामध्ये एक आमदार कुशवाह यांच्या पत्नी आहेत. कुशवाह यांनी आपल्या मुलाला आमदार नसतानाही मंत्रिपदावर बसविल्याने आमदारांमध्ये नाराजी आहे. ही नाराजी उघडपणे समोर आली आहे.
‘एनडीए’कडे बहुमत असले तरी राज्यात मोठा भाऊ कोण, यावरून भाजप आणि संयुक्त जनता दलामध्ये चढाओढ सुरू असल्याची चर्चा आहे. त्याचा मोठा फटका विरोधकांना बसू शकतो. प्रामुख्याने राज्यात दयनीय स्थितीत असलेल्या काँग्रेसला सहा आमदारांकडून धक्का दिला जाऊ शकतो. असे झाल्यास केवळ काँग्रेसच नव्हे तर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलासाठीही हे सूचक संकेत असतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.