

Congress Alliance News : तमिळनाडू भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी नुकताच पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत अण्णामलाई यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. आता एका मित्रपक्षानेही भाजपची साथ सोडली आहे. या पक्षाने आज आपण एनडीएतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे.
तमिळनाडू एनडीएतील मित्रपक्ष असलेल्या तमिळ मनिला काँग्रेस (मूपनार) या पक्षाने आज आपला निर्णय जाहीर केला. भाजपसाठी तमिळनाडूमध्ये हा दुसरा मोठा झटका मानला जात आहे. तमिळ मनिला काँग्रेसचे पाच उमेदवार पहिल्यांदाच भाजपच्या चिन्हावर विधानसभा निवडणुकीत उतरले होते. मात्र, त्यांचा पराभव झाला. त्यानंतर टीएमसीमध्ये वाद उफाळून आला होता.
पक्षाचे अध्यक्ष जी. के. वासन यांनी या निर्णयाची घोषणा करताना सांगितले की, पक्षाच्या आघाडीबाबत आजच्या कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा झाली. एनडीएच्या विजयासाठी आम्ही खूप प्रयत्न केले होते. पण आता स्वतंत्रपणे पक्ष मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही एनडीए आघाडीतून बाहेर पडत असल्याचे वासन यांनी स्पष्ट केले.
वासन यांनी आता पुढे कोणत्या पक्षासोबत आघाडी करणार, याबाबत स्पष्ट केले नसले तरी सध्याची राजकीय परिस्थिती पाहता त्यांच्यासमोर टीव्हीके-काँग्रेस आघाडी हा पर्याय असल्याची चर्चा आहे. त्याचप्रमाणे पक्षाचा इतिहास पाहता काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करण्याचाही पर्याय असू शकतो, असे तर्क लढविले जाऊ लागले आहेत.
काय आहे टीएमसीचा इतिहास?
१९९६ मध्ये ज्येष्ठ नेते जी. के. मूपनार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत तमिळ मनिला काँग्रेस म्हणजेच टीएमसीची स्थापना केली होती. त्यांच्या निधनानंतर २००२ मध्ये पक्षाची सुत्रे त्यांचे पुत्र जी. के. वासन यांच्याकडे आली. वासन यांनी काही महिन्यांतच आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. २०१४ पर्यंत वासन हे काँग्रेसमध्ये होते. या काळात त्यांना केंद्रीय मंत्रीपदही मिळाले होते.
वासन यांनी २०१४ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडत पुन्हा तमिळ मनिला काँग्रेस (मूपनार) या पक्षाची स्थापना केली. त्यानंतर २०१९ पासून ते एनडीएसोबत होते. २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला एकही जागा मिळाली नाही. आज त्यांनी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यातच मागील काही दिवसांपासून काँग्रेसमधील काही नेत्यांकडून पक्षातून फुटलेल्या पक्षांनी विलीन होण्याची भूमिका मांडली जात आहे.
टीएमसीने यापूर्वीही काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला होता. तमिळनाडूतील सध्याची राजकीय स्थिती पाहता वासन यांच्याकडून काँग्रेससोबत आघाडी करण्याचा किंवा काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.