
New Delhi News : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचा धुव्वा उडवत भाजपनं एकहाती सत्ता खेचून आणली. पण या निवडणुकीत आपच्या अरविंद केजरीवाल यांना ज्याचा सर्वात जास्त फटका बसला, जो मुद्दा प्रचारात भाजपनं (BJP) प्रभावीपणे लावून धरला तो म्हणजे ज्याचा उल्लेख शीशमहल असा केला जात आहे ते मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान अर्थात 6, फ्लॅगस्टाफ रोड हे ठरले.
या शीशमहलवरुनच आप प्रचंड बॅकफूटला गेलं.पण आता हाच शीशमहल ओस पडण्याची शक्यता आहे. कारण 27 वर्षांनी दिल्लीच्या सत्तेत परतलेल्या भाजपनं शीशमहलबाबत मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.
दिल्लीच्या राजकारणात येण्यापूर्वी कोणत्याही सरकारी सुविधा घेणार नसल्याची घोषणा करणारे अरविंद केजरीवालांनी (Arvind Kejriwal) मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांच्या शासकीय निवासस्थानात स्वतःसाठी अनेक आलिशान सुविधा करून घेतल्या. हीच संधी साधत भाजपनं आप आणि केजरीवालांवर टीकेची भडिमार करत अडचणीत आणलं. यामुळे 'आप'ला दिल्लीची सत्ताही गमवावी लागली.आता दिल्लीचे भावी मुख्यमंत्री या शीशमहलमध्ये राहणार नसल्याचं भाजपाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री असताना 'शीशमहाल' म्हणून उल्लेख होत असलेली वास्तू त्यांचे अधिकृत शासकीय निवासस्थान होते. केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर हे घर रिकामं केलं. त्यानंतर PWD नं शीशमहालातील सामानांची यादी प्रसिद्ध केली.ती यादी माध्यमांसह सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आता तीन ते चार दिवस पूर्ण झाले आहेत. बहुमतासह सत्तेत परतल्यानंतर भाजपमध्ये सत्तास्थापनेसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पण अद्याप दिल्ली मुख्यमंत्रीपदासाठीचा भाजपचा चेहरा अद्याप ठरलेला नाही. पण यापू्र्वी झालेल्या महाराष्ट्र, राजस्थान,मध्यप्रदेश,हरियाणातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपनं वेळ घेत मुख्यमंत्री पदाच्या चेहर्यावर शिक्कामोर्तब केलं होतं. त्यामुळे दिल्लीतही मुख्यमंत्रीपदाबाबत धक्कातंत्र वापरण्याची शक्यता आहे. याबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याचं दिसून येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या विदेश दौऱ्यावर असून ते भारतात परतल्यानंतरच दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होणार असल्याची माहिती भाजपच्या गोटातून समोर येत आहे.मात्र,दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावांबाबत अनेक कोण येणार? याची जशी चर्चा सध्या सुरू आहे,तशीच चर्चा ही व्यक्ती कुठे राहणार? याचीही आहे.
भाजपाचे अध्यक्ष विरेंद्र सचदेव यांनी दिल्लीचे उपराज्यपाल व्ही.के.सक्सेना यांना दिल्लीतील 6,फ्लॅगस्टाफ रोड या निवासस्थानी पुढचे मुख्यमंत्री राहणार नाहीत,असं कळवलं आहे.तसेच या निवासस्थानाबाबत आगामी काळात निर्णय घ्यायचा,यासंदर्भात दिल्ली सरकार ठरवेल,असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
तर दुसरीकडे भाजप आमदार व माजी विरोधी पक्षनेते विजेंदर गुप्ता यांनी उपराज्यपालांना पत्राद्वारे मोठी मागणी केली आहे. त्यांनी पत्रात 6, फ्लॅगस्टाफ रोड हे निवासस्थान मूळ स्वरूपात आणण्यात यावे याविषयीची विनंती करण्यात आले आहे. भाजपानं निवडणूक काळात शीशमहालची पुनर्बांधणी करताना केजरीवाल यांनी आसपासच्या सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोपही केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.