
Bengaluru News : कर्नाटकमध्ये गेल्या काही दिवसापासून भाजपमध्ये मोठ्या घडामोडी होत असतानाच आता दोन आमदारांवर कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे. भारतीय जनता पक्षाने आमदार एस. टी. सोमशेखर आणि शिवराम हेब्बार यांची पक्षविरोधी कारवायांच्या आरोपाखाली पक्षातून हकालपट्टी केली आहे. यामुळे कर्नाटक भाजपमध्ये सध्या खळबळ उडाली असून याआधी विजापूरचे आमदार बसवराज पाटील यत्नाळ यांच्यावर पक्षाने कारवाई केली होती. आतापर्यंत भाजपने तीन आमदारांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. सोमशेखर आणि हेब्बार यांची पक्षाने 6 वर्षांसाठी हाकालपट्टी केली आहे.
बंडखोर आमदार एस. टी. सोमशेखर आणि शिवराम हेब्बार हे कधीकाळी काँग्रेसचेच नेते होते. पण गेल्यावेळी त्यांनी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता. पण आता ते भाजप पक्षाविरुद्ध उघडपणे बोलले होते. त्यांना काँग्रेसमधून वारंवार बोलवलं जात होतं. त्यानंतर आता अपेक्षेप्रमाणे भाजप पक्षातून काढून टाकण्यात आले आहे.
भाजप शिस्तपालन समितीने केंद्रीय समितीला एक अहवाल सादर केला होता, ज्यामध्ये आमदार एस.टी. सोमशेखर आणि शिवराम हेब्बार यांना पक्षातून काढून टाकण्याची शिफारस करण्यात आली होती. यावर बोलताना भाजप प्रदेश शिस्तपालन समितीचे अध्यक्ष लिंगराज पाटील म्हणाले, 'आमदार एस.टी. सोमशेखर आणि शिवराम हेब्बार यांना पक्षातून काढून टाकण्याची विनंती करणारा अहवाल मी केंद्रीय समितीला सादर केला आहे. राष्ट्रीय आणि राज्य नेत्यांनी सांगितले होते की, ते या महिन्याच्या अखेरीस पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या आमदारांविरुध्द कारवाई करतील.
"पक्षाच्या केंद्रीय समितीने मतभेद निर्माण करणाऱ्या नेत्यांचा अहवाल मागितला होता." मंडल अध्यक्ष आणि जिल्हा शाखांच्या अध्यक्षांच्या अहवालांच्या आधारे, मी एक वर्षापूर्वी एक अहवाल सादर केला होता, ज्यामध्ये दोन आमदारांना पक्षातून काढून टाकण्याची विनंती करण्यात आली होती. तथापि, मला कोणत्याही खासदार किंवा आमदारावर कारवाई करण्याचा अधिकार नाही.
माझे काम फक्त अहवाल देणे आहे. शिस्तपालन समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर अनेक प्रकरणे समोर आली. बहुतेक प्रकरणांवर पक्ष नेत्यांसमोर चर्चा करून ती निकाली काढण्यात आली आहेत. मी काही प्रकरणांची तक्रार केली आहे. पक्षाच्या तत्वांनुसार आणि नियमांनुसार शिस्तभंगाचा अहवाल तयार केला जाईल, असे लिंगराज पाटील म्हणाले होते.
दोन्ही आमदार मूळचे काँग्रेस पक्षाचे आहेत. गेल्या कार्यकाळात कुमारस्वामी सरकार उलथवून भाजपमध्ये सामील झाल्यानंतर ते मंत्री होते. 2023 च्या विधानसभा निवडणुका त्यांनी भाजपच्या वतीने लढवल्या आणि जिंकल्या, परंतु काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी भाजप पक्षासाठी काम केले नाही तर काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस नेत्यांच्या बाजूने ते बोलत राहिले. भाजपने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाला ते साथ देत नव्हते.
त्यांनी सर्व सरकारी कार्यक्रमांमध्ये स्वतःला काँग्रेस नेते म्हणून ओळखले आहे आणि विरोधी पक्षाचे सदस्य म्हणून काम करण्याऐवजी, त्यांनी भाजपच्या कामाच्या आणि उपक्रमांच्या विरुद्ध काम केले आहे. या संदर्भात, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र यांनी वारंवार इशारा देऊनही आपले मार्ग बदलले नाहीत. म्हणून, यशवंतपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार एस. टी. सोमशेखर आणि येल्लापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवराम हेब्बार या दोघांनाही भाजपमधून काढून टाकण्यात आले आहे.
कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र म्हणाले की, दोघांनीही पक्षविरोधी काम केले होते. यासाठी आम्ही केंद्राकडे अपील केले होते. आम्ही योग्य कारवाईची मागणी केली. आता, आमदार, शिवराम हेब्बर आणि एस. टी. सोमशेखर यांना ६ वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. त्यांनी पक्षविरोधी काम केले आहे, हे त्यांना देखील माहित आहे. केंद्रातील नेत्यांनाही याची कल्पना आहे. त्यांनी पक्षात सत्ता उपभोगली होती. मला वाटतं विरोधी पक्षात बसणं कठीण होतं. केंद्रीय शिस्तपालन समितीच्या निर्णयाचे मी स्वागत करतो, असे ते म्हणाले.
विजापुरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनाही काही महिन्यांपूर्वी भाजप नेत्यांचा अनादर केल्याबद्दल आणि भाजपच्या एकतेला हानी पोहोचवल्याबद्दल भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांचा इतर कोणत्याही पक्षाशी संबंध नव्हता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र यांना प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त करण्यास ते विरोध करत होते. ते कतांही पक्ष नेत्यांच्या स्वतंत्र बैठका घेत होते.या पार्श्वभूमीवर त्यांना पक्षातून ६ वर्षांसाठी काढून टाकण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.