
Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकडे निर्णायकी लढत म्हणून पाहिले जात आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होत आहेत. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीने 48 पैकी 31 जागा जिंकल्या होत्या तर दुसरीकडे त्यानंतर सहा महिन्याने झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने बाजी मारली होती.
288 पैकी 232 जागा जिंकल्या होत्या. या दोन निवडणुकात महाविकास आघाडी व महायुतीमध्ये एक-एक अशी बरोबरी झाली होती. त्यामुळे आता आगामी काळात होत असलेल्या स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक गेल्या तीन वर्षांपासून रखडल्या होत्या. या रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर मुहूर्त लागला आहे. इतर मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणाबाबतच्या खटल्यांमुळे वर्षानुवर्षे रखडलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना मंजुरी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात राज्य निवडणूक आयोगाला चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वच घटक पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit shah) तीन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेऊन निवडणुकीबाबत सूचना करण्याची शक्यता आहे. दरम्यान, सोमवारी त्यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेड येथील बालेकिल्ल्यातून त्यांनी प्रचाराची सुरुवात केली आहे.
या सभेला राज्यातील भाजपमधील (BJP) दिगग्ज नेते उपस्थित होते. त्यामुळे येत्या काळात भाजप महायुतीमध्ये एकत्रित निवडणूक लढणार की स्वबळावर निवडणूक लढणार याची उत्सुकता लागली आहे. नांदेडमधील भाजपच्या ज्येष्ठ नेत्याच्या रॅलीतून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरु केली आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह नेतेमंडळी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थित निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (यूबीटी) आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये विलीनीकरणाच्या कथित चर्चेच्या पार्श्वभूमीवर शहा यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
त्यातच या दौऱ्यावेळी महायुतीमधील तीन पक्ष ही निवडणूक स्वबळावर लढणार की महायुतीमध्ये तीन पक्ष एकत्र लढणार यावर निर्णय बाकी आहे. त्यामुळे आता शहा महायुतीबाबत स्थानिकच्या निवडणुकीबाबत काय सूचना देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.