देवेगौडा-बोम्मई भेटीने कर्नाटकातलं राजकारण तापलं...नवीन मुख्यमंत्री अडचणीत

बसवराज बोम्मई यांनी कर्नाटकचा कारभार हाती घेतल्यानंतर महिन्याच्या आतच त्यांच्यासमोरील अडचणी वाढू लागल्या आहेत.
BJP mla raised question about cm bommai and devegowda meeting
BJP mla raised question about cm bommai and devegowda meeting
Published on: 
Updated on: 

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांची नियुक्ती झाली. बोम्मई यांनी राज्याचा कारभार हाती घेतल्यानंतर महिन्याच्या आतच त्यांच्यासमोरील अडचणी वाढू लागल्या आहेत. त्यांनी माजी पंतप्रधान एच.डी.देवैगौडा यांची भेट घेतली होती. यावरुन गदारोळ सुरू झाला असून, भाजपच्या (BJP) आमदारांनीच जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. 

बोम्मई यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार हाती घेताच त्यांच्यासमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या नेत्यांनी त्यांची डोकेदुखी वाढवली आहे. यातच खातेवाटपात महत्वाचे खाते न मिळालेले मंत्री उघडपणे नाराजी व्यक्त करीत आहेत. आता बोम्मई यांनी माजी पंतप्रधान व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) नेते एच.डी.देवैगौडा यांची घेतलेली भेट गाजू लागली आहे. 

बोम्मई यांनी मंत्रिमंडळाच्या शपथविधी देवेगौडा यांची भेट घेतली होती. यावर  भाजप आमदार प्रितम जे. गौडा यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे मंत्रिमंडळाच्या शपथविधीआधी देवेगौडा यांना भेटण्यास का गेले? यातून ते पक्ष कार्यकार्त्यांना कोणता संदेश देऊ इच्छितात? पक्ष कार्यकर्तेच आता हा प्रश्न उपस्थित करीत आहेत. याबाबत मी स्वत: मुख्यमंत्र्याशी चर्चा करणार आहे. 

बोम्मई यांनी मुख्यमंत्रिपदाची थपथ घेतल्यानंतर आठवडाभराने मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता. त्यावेळी 29 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. नव्या मंत्रिमंडळात जुन्यांसोबत नव्या चेहऱ्यांनाही स्थान देण्यात आले. नव्या मंत्रिमंडळात 7 ओबीसी, 3 अनुसूचित जाती, 1 अनुसूचित जमाती, 8 लिंगायत, 1 रेड्डी आणि 1 महिला आहे. मंत्रिमंडळात 6 नवीन चेहरे आहेत. बोम्मई यांनी नुकतेच मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर केले आहे. 

येडियुरप्पांच्या रुपाने दक्षिणेत भाजपचा पहिला मुख्यमंत्री झाला होता. येडियुरप्पांची मुख्यमंत्रिपदाची ही चौथी टर्म होती. त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. राजीनाम्यानंतर केंद्रीय निरीक्षक म्हणून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि जी.किशन रेड्डी यांनी भाजप आमदारांची बैठक घेतली होती. या बैठकीत बोम्मई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या बैठकीत येडियुरप्पाही उपस्थित होते. बोम्मई हे येडियुरप्पा यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. येडियुरप्पा यांच्या संमतीनेच त्यांची निवड झाली होती. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.