
Modi Shah strategy : भारताचे नवे उपराष्ट्रपती कोण असणार, या प्रश्नाचे उत्तर पुढील काही दिवसांत मिळेल. मात्र, मागील चार दिवसांपासून उपराष्ट्रपतीपदी विविध नेत्यांच्या नावांबाबत तर्क लढवले जात आहेत. प्रामुख्याने बिहार विधानसभेची निवडणूक, मुख्यमंत्रिपद लक्षात घेऊन भाजपकडून या राज्यातील मित्रपक्षातील नेत्यांना संधी दिली जाईल, अशीही जोरदार चर्चा आहे. त्यातही दोन नावे आघाडीवर होती. पण आता उपराष्ट्रपतीपदावर भाजपचाच नेता विराजमान होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर एनडीएची सत्ता आल्यास भाजपला मुख्यमंत्रिपद हवे आहे. पण विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार पद सोडायला तयार नाहीत. जगदीप धनखड यांनी अनपेक्षितपणे उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदासाठी नितीश कुमार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. त्याचप्रमाणे त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते रामनाथ ठाकूर यांचेही नाव पुढे आले होते.
‘एनडीटीव्ही’ने भाजपमधील एका ज्येष्ठ नेत्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, भाजपच्या विचारसरणीशी एकनिष्ठ असलेला नेताच उपराष्ट्रपदी असेल, असे या नेत्याने स्पष्ट केले आहे. ठाकूर यांनी नुकतीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली होती. त्यानंतर ठाकूर यांचे नाव चर्चेत होते. पण ही नियमित भेट असल्याचेही या नेत्याने स्पष्ट केले.
दरम्यान, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, राज्यपाल हरिभाऊ बागडे आदी काही नेत्यांची नावेही चर्चेत असल्याचे वृत्त आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची स्ट्रॅटेजी आणि यापूर्वीचा या दोन्ही नेत्यांचा मुख्यमंत्री किंवा इतर पदांसाठी नेत्यांची निवड करण्याचा लौकिक पाहता यावेळी सर्वांनाच अनपेक्षित धक्का बसण्याची शक्यता आहे.
उपराष्ट्रपतीपदासाठी चर्चेत नसलेले नाव अनपेक्षितपणे पुढे येऊ शकते. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह अनेक राज्यांमधील मुख्यमंत्रिपदाबाबत मोदी-शहांनी केलेल्या निवडींमुळे पक्षातील नेतेही बुचकळ्यात पडले होते. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याबाबतीतही तेच घडले होते. उपराष्ट्रपती होण्याआधी ते पश्चिम बंगालचे राज्यपाल होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.