Congress Vs BJP : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहचला आहे. राज्यातील काँग्रेस आणि भाजप एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुरुवारी (ता. २७) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे भाजपने आक्रमक होत खर्गे यांच्यावर टीकेची झोड उठवली. त्यानंतर शुक्रवारी (ता. २८) भाजपनेही काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर जहरी टीका केली. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) म्हणाले होते, "मोदी हे विषारी सापासारखे आहेत. तुम्ही त्यांना विष माना किंवा मानू नका, पण त्याचा स्वाद घेतला तर नक्की मराल." खर्गे यांच्या या विधानानंतर भाजपने त्यांचा निषेध केला. दरम्यान, या विधानामुळे वाद निर्माण झाल्यानंतर आता खर्गे यांनी त्याबाबत स्पष्टीकरणही दिले. खर्गे म्हणाले, "भाजपची विचारधारा ही फूट पाडणारी, शत्रुत्वाची, गरीब आणि दलितांबद्दल द्वेष करणारी आहे. मी फक्त या द्वेष आणि द्वेषाच्या राजकारणावर चर्चा केली. मी मोदीबद्दल हे बोललो नाही. मी वैयक्तिक विधाने केली नाहीत. मला असे म्हणायचे आहे की, त्यांची विचारधारा ही विषारी सापासारखी आहे."
खर्गे यांनी स्पष्टीकरण देऊनही हा वाद काही केल्या थांबताना दिसत नाही. खर्गे यांच्या विधानानंतर भाजपचे आमदार बासनगौडा यांनी सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना विषकन्या म्हणून संबोधले.
बासनगौडा म्हणाले, "एक काळ असा होता की पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना अमेरिकेने व्हिसा नाकारला होता. त्यानंतर मात्र त्यांनी मोदींसाठी रेड कार्पेट टाकले. संपूर्ण जगाने मोदी यांचे नेतृत्व मान्य केले आहे. अशा पंतप्रधान मोदींवर मल्लिकार्जुन खर्गे यांनी विषारी साप असे म्हटले. ते विष ओकतात, असे म्हटले. आता मी खर्गेंना सांगतो की ते ज्या पक्षात नाचत आहेत त्या पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी विषकन्या आहेत. त्यांनी चीन आणि पाकिस्तानच्या एजंटचे काम केले."
दरम्यान, खर्गेंच्या वक्तव्यावरून भाजपने त्यांच्यावर सर्वबाजूने टीकेची झोड उठविली. भाजपचे नेते व गृह राज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले, "काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधानांसाठी 'विषारी साप' अशी आक्षेपार्ह भाषा वापरली आहे. खर्गे आणि काँग्रेसने विष पेरले. समाजातील विभाजनाचे विष, देशाच्या फाळणीचे विष, भ्रष्टाचाराचे विष, राजकारणातील घराणेशाहीचे विष - हे सर्व काँग्रेसने (Congress) पेरलेले विष आहे."
भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले की, "आता काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी पंतप्रधान मोदींना विषारी साप म्हटले. याची सुरुवात सोनिया गांधींच्या 'मौत का सौदागर'पासून झाली. त्याचा शेवट कसा झाला हे आम्हाला माहीत आहे. काँग्रेस सतत खड्ड्यात उतरत आहे. कर्नाटकात काँग्रेसचा पराभव होत असल्याचे या निराशेतून दिसून येते आणि ते त्यांना माहीत आहे."
आता भाजपकडून (BJP) काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याबाबत विषकन्या असे शब्द वापरलेले आहेत. त्यामुळे राज्यातील 'जहरी' टीकेचा वाद वाढणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.