Chhattisgarh Election 2023 News : छत्तीसगडमध्ये मंगळवारी (07 नोव्हेंबर) विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात 20 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात १७ नोव्हेंबरला ७० जागांसाठी मतदान होईव. आज 10 जागांवर सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत, तर 10 जागांवर सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होईल
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून निवडणूक आयोगाने छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh Election 2023) दोन टप्प्यात मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. यावेळची विधानसभा निवडणूक अनेक अर्थांनी खास आहे. काँग्रेस सलग दुसऱ्यांदा सत्तेत येण्याचा दावा करत असताना भाजपने काँग्रेसचा पराभव करण्यासाठी आपले अनेक खासदार मैदानात उतरवले आहेत. भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
पहिल्या टप्प्यात छत्तीसगडमधील (Chhattisgarh) 9 जिल्ह्यांतील विधानसभेच्या 20 जागांसाठी आज मतदान होत आहे. यातील बहुतांश जिल्हे नक्षलग्रस्त असून, ते सर्व आदिवासीबहुल भाग आहेत. या 20 जागांपैकी 12 जागा एसटीसाठी राखीव आहेत. 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत या 9 जिल्ह्यांची एकूण मतदानाची टक्केवारी 77.23 टक्के होती. एवढेच नाही तर विद्यमान मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांच्या भवितव्याचाही आज पहिल्या टप्प्यातील मतदानात ईव्हीएममध्ये निर्णय होणार आहे. पहिल्या टप्प्यात ज्या भागात मतदान होत आहे ते जवळपास 5 राज्यांच्या सीमेला लागून आहेत.
आज होणाऱ्या मतदानासाठी 5 हजार 304 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. 40.78 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 19.93 लाख, तर महिला मतदारांची संख्या 20.84 लाख इतकी आहे. ६९ मतदार हे तृतीय पंथी आहेत.
पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी भाजपचे 20, काँग्रेसचे 20, आम आदमी पार्टीचे 10, बसपचे 15 आणि JCC (J)चे 15 उमेदवार रिंगणात आहेत. सर्वाधिक उमेदवारांबाबत बोलायचे झाले तर राजनांदगाव मतदारसंघातून 29 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्याचवेळी चित्रकोट आणि दंतेवाडामध्ये सर्वात कमी 7 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 223 उमेदवारांपैकी 25 महिला उमेदवार आहेत.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.