
Vice President Jagdeep Dhankhar Responds : सरन्यायाधीश भूषण गवई रविवारी सत्काराच्या कार्यक्रमासाठी मुंबईत आले होते. पदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच राज्यात आले. पण या कार्यक्रमावेळी राज्याच्या मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, पोलिस आयुक्त यांच्यापैकी कुणीच उपस्थित नसल्याने त्यांनी प्रोटोकॉलचा मुद्दा काढत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी या चर्चेत उडी घेतली आहे.
उपराष्ट्रपती धनखड यांनी सोमवारी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना प्रोटोकॉलवरून नाराजी व्यक्त केली. सरन्यायाधीश गवई यांना आलेल्या अनुभवानंतर धनखड म्हणाले, देशाच्या सरन्यायाधीशांनी प्रोटोकॉलला खूप महत्व दिले. त्यांनी दिलेले संकेत वैयक्तिक नव्हते, ते त्यांच्या पदासाठी होते. हे सर्वांनी लक्षात ठेवायला हवे. प्रोटोकॉलचे पालन होणे गरजेचे आहे. मीही प्रोटोकॉलचा पीडित आहे.
यादरम्यान धनखड यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या फोटोशेजारी उपराष्ट्रपतींचा फोटो नसल्यावरूनही नाराजी व्यक्त केली. तुम्ही अनेक ठिकाणी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचा फोटो पाहिला असेल. पण उपराष्ट्रपतींचा फोटो नसतो. मी माझ्या कार्यकाळात हे काम निश्चितपणे करेन. माझ्यानंतरच्या उपराष्ट्रपतींचा फोटो तिथे नक्की असेल, असे धनखड म्हणाले.
दरम्यान, धनखड यांनी या कार्यक्रमात पुन्हा एकदा संविधानातील कोणतीही संस्था सर्वोच्च नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, कोणतीही संस्था सर्वोच्च नाही संसद, न्यायपालिका किंवा कार्यपालिका हे तिन्ही आपल्या संविधानाचे अवयव आहेत. पण प्रत्येक संस्थेने संविधानाने घालून दिलेली मर्यादा पाळायला हवी.
दोषी सिध्द होईपर्यंत एखादा व्यक्ती निर्दोष असण्याच्या अधिकाराबाबत बोलताना उपराष्ट्रपती म्हणाले की, मी आरोप करत नाही. माझे केवळ एवढेच म्हणणे आहे की, राष्ट्रहितासमोर आपण आतले आणि बाहेरचे असे विभागले जाऊ शकत नाही. एक मजबूत आणि स्वतंत्र न्यायव्यवस्था नागरिकांसाठी सर्वात सुरक्षित गॅरंटी आहे.
सत्काराच्या कार्यक्रमात बोलताना सरन्यायाधीश गवई यांनी प्रोटोकॉलवरून नाराजी व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, महाराष्ट्र राज्यातील एक व्यक्ती सरन्यायाधीश म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा येत असताना महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना किंवा महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकांना किंवा मुंबई पोलिस आयुक्तांना तिथे येण्याची योग्यता वाटत नसेल तर त्याबाबत त्यांनीच विचार करावा, अशी नाराजी सरन्यायाधीशांनी व्यक्त केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.