
कधीकाळी काँग्रेसचे मातब्बर नेते म्हणून ओळख असलेले खासदार शशी थरूर सध्या अडगळीत गेल्यासारखी स्थिती आहे. ते काँग्रेसच्या गळ्यातील लोढणं बनले आहेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. काँग्रेसमधील दुसरे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी नुकतंच एक विधान केलंय. काँग्रेसमध्ये असणं आणि काँग्रेससाठी काम करणं यात फरक असल्याचे त्यांनी म्हटलंय. तसं पाहिलं तर हे विधान पक्षातील अनेकांसाठी लागू होतं, पण सध्या चर्चा आहे ती शशी थरूर यांची.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला चांगलीच अद्दल घ़डवली. त्यानंतर भारताने आपली बाजू जगासमोर मांडत पाकिस्तानचा बुरखा फाडण्यासाठी खासदारांचे शिष्टमंडळ पाठविण्याचा निर्णय घेतला. या शिष्टमंडळामध्ये सर्वपक्षांच्या नेत्यांचा समावेश करण्यात आला. त्यात एक नाव होते थरूर यांचे. पण काँग्रेसने त्यावर आक्षेप घेतल्याने त्याला वेगळेच वळण लागले.
पक्षाने सरकारकडे चार नावे पाठविली होती. त्यामध्ये थरूर यांचे नाव नव्हतेच, असे सांगत काँग्रेसने सरकारच्या निवडीवर आक्षेप घेतला. त्यावरून आता राजकारण रंगले आहे. शशी थरूर यांनीही त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. मला थेट किरण रिजिजू यांच्याकडून याबाबत फोन आला होता. त्यानंतर मी पक्षालाही कळवले. चार जणांच्या नावाबाबत आपल्याला माहिती नसल्याचे थरूर यांनी सांगितले. तसेच पक्षाच्या भूमिकेमुळे आपला अपमान झाला नसल्याचे सांगतान मला माझी किंमत माहिती असल्याचेही म्हटले.
थरूर यांचे हे विधान खूपच बोलके आहे. काँग्रेसने मागील काही वर्षांत त्यांना सातत्याने डावलले आहे. यूपीए सरकारच्या काळात ते केंद्रीय राज्यमंत्री होते. पण त्यांना मनासारखे पद मिळाले नाही. केरळमध्येही पक्षात त्यांना अपेक्षित संधी मिळाली नाही. त्यामुळे ते पक्षसंघटनेत फारसे सक्रीय दिसले नाहीत. त्यातच मागील काही महिन्यांत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्र सरकारचेही कौतुक केल्याचे समोर आले होते. त्यामुळे त्यांची भाजपशी जवळीक वाढल्याची जोरदार चर्चा आहे.
काँग्रेसचा कोणताही नेता उघडपणे शशी थरूर यांच्याविषयी बोलत नाही. पण वरिष्ठ पातळीवर शरूर यांच्याबाबत प्रचंड नाराजी असल्याची चर्चा आहे. पक्षाच्या धोरणाच्या विपरीत ते अनेकदा सरकारच्या बाजूने बोलत असल्याचा पक्षातील नेत्यांचा दावा आहे. मग तो पंतप्रधानांचा अमेरिका दौरा असो की 1971 च्या युध्दावेळची इंदिरा गांधींची भूमिका... शशी थरूर हे अनेकदा पक्षाच्या निशाण्यावर आले आहेत. पण काँग्रेस थेटपणे कारवाई करण्यास कचरत असल्याची चर्चा आहे. सध्याच्या वातावरणात पक्षाला त्याचा राजकीय फटका बसू शकतो.
थरूर यांच्यावर कारवाई केल्यास किंवा साधी नोटीस बजावली तरी भाजपच्या हाती आयते कोलित मिळू शकते. भाजपकडून त्याचे भांडवल करून काँग्रेसवर निशाणा साधला जाऊ शकतो. दहशतवादी हल्ला ते शिष्टमंडळ या संपूर्ण घटनाक्रमामध्ये थरूर हे परखडपणे सरकारची बाजू घेत आहेत. काँग्रेसकडूनही सरकारला पाठिंबा दिला जात आहे. पण शिष्टमंडळातील निवडप्रक्रियेवर पक्षाने आक्षेप घेतला आहे. त्यावरून वादाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे थरूर यांच्याबाबत पक्षाला सध्यातरी वेट अँड वॉचची भूमिका घ्यावी लागणार आहे.
केरळमधील पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक आहे. राज्यात काँग्रेसची ताकद बऱ्यापैकी असून प्रमुख विरोधी पक्ष आहे. थरूर यांची भूमिका आगामी निवडणुकीवेळी महत्वाची ठरू शकतो. थरूर पक्षातून बाहेर पडल्याने काँग्रेसला निश्चितपणे फटका बसू शकतो. पण पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची त्यांना जाऊ द्यावे, अशी भूमिका असल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे आता थरूर यांनाच आपल्या राजकीय भवितव्यासाठी निर्णय घ्यावा लागणार आहे. ते पक्षात राहिले तरी काँग्रेसला त्यांच्या विधानांची अन् भूमिकेची असणार, हे निश्चित.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.