

Cockroch Party: कॉकरोच जनता पार्टी या नावानं सुरु झालेली एक चळवळ आता राजकीय कार्यक्रमाच्या दिशेनं वाटचाल करताना दिसते आहे. यासाठी या चळवळीचा प्रमुख अभिजीत दिपके यानं नुकतंच जाहीर केलं त्याप्रमाणं या पार्टीच्या प्रवक्त्यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. विशेष म्हणजे ज्या तीन जेनझी तरुणांनी ही पत्रकार परिषद घेतली ते यापूर्वी कधीही राजकारणात नसलेले फ्रेश चेहरे असून यांपैकी एक जण सोशल मीडिया कंटेन्ट क्रिएटर कम फिल्म मेकर, एक जण शोध पत्रकार आणि एक जण आयआयटी कानपूर आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतलेला सामाजिक कार्यकर्ता तरुण आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी थेटपणे परीक्षांमध्ये सुरु असलेल्या घोटाळ्यांविरोधात आवाज उठवला. तसंच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
ही पत्रकार परिषद घेणारा कॉकरोच जनता पार्टीचा प्रमुख प्रवक्ता असलेला पत्रकार सौरव दास यानं सांगितलं की, व्यवस्थेमध्ये कोणावरतरी जबाबदारी असायला हवी, अशी आमची मागणी आहे. कारण ८ लाख लोकांनी एका ऑनलईन पेटिशनवर सह्या केल्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पण आजवर सरकारकडून यावर काहीही उत्तर आलेलं नाही. सरकारनं केवळ या प्रकरणात दोन अधिकाऱ्यांची बदली केली. पण मीडिया सातत्यानं हे दाखवत आहे की सीबीएससीचा ऑनलाईन उत्तर पत्रिका तपासणी घोटाळ्यात सरकारनं मोठी कारवाई केली आहे. पण या कारवाईनंतर त्यांपैकी एका अधिकाऱ्याला कृषी खात्यातचा सचिव म्हणून नेमण्यात आलं. मग ही काय शिक्षा आहे का? यामध्ये त्यांच्यावर कमीत कमी कारवाई ही निलंबनाची तरी हवी होती. पण तेही झालेलं नाही.
अशा प्रकारे व्यवस्थेमध्ये जो निगरगट्टपणा आला आहे, त्याविरोधात लोक आता खुलेपणानं बोलायला लागले आहेत. त्यामुळं देशभरातून लोक कॉकरोच पार्टीला पाठिंबा देत आहेत. गेल्या अनेक वर्षात इतके पेपर लीक झाले यामध्ये नेमक्या काय कारवाया झाल्या? हे कोणालाही माहिती नाही. किती लोकांना शिक्षा झाल्या, किती लोकांना अटक झाली, किती बड्या लोकांना पकडलं गेलं? हे कोणालाही माहिती नाही. म्हणून कॉकरोच जनता पार्टीचे जे संस्थापक आहेत त्यांनी दिल्लीतील शनिवारी, ६ जून रोजी शांततेत निषेध आंदोलनाचं आवाहन केलं आहे. यासाठी आमची विनंती आहे की, देशातील तरुणांनी या आंदोलनात शांततेत सहभागी व्हावं आणि आपली मागणी ठेवावी. यामध्ये आमची केवळ एकच मागणी आहे की, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक ज्यांना सरकारनं तुरुंगात धाडलं होतं ते देखील आमच्यासोबत आहेत.
अभिजीत दिपके हे सकाळी ८ वाजता दिल्ली विमानतळावर येणार आहेत. त्यानंतर तिथं त्यांचे समर्थक त्यांचं स्वागत करतील त्यानंतर वांगचूक यांच्यासोबत सर्वजण पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात जाऊन जंतरमंतर मैदानावर निषेध आंदोलनासाठी परवानगी मागतील. या ठिकाणी सर्व आंदोलकांचं स्वागत आहे, या ठिकाणी सर्व राजकीय पक्षांना देखील आवाहन आहे, त्यांनी इथं आपल्या पक्षाचे झेंडे बाजुला ठेवून यावं.
विजेता दहिया यानं सांगितलं की, नीटचा पेपर लीक झाला, एसएससी जीडीमध्ये घोटाळा, सीबीएससीच्या पेपरमध्ये घोटाळा अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या कारण त्यांच्यावर परीक्षांचं ओझं आहे. तसंच इतर विद्यार्थ्यांचं परीक्षा रद्द झाल्यामुळं एक वर्ष वाया गेलं, त्यानंतरही कोणीही याची जबाबदारी घ्यायला तयार नाही. असं का झालं? असा प्रश्न विचारला गेला तर लोक म्हणतात सोडून द्या असं होतंच असतं? हा कुठल्या प्रकारचा न्याय आहे. आपण खरंच लोकशाहीत राहतोय का? पाच वर्षात एकदा मतदान करुन तुम्ही राजे लोकांना निवडून दिलं त्यानंतर आता पुढच्या वर्षीच तुम्ही मतदान करायचं पण मधल्या काळात त्यांनी काहीही करु देत. आपण राजे लोकांना निवडून दिलेलं नाही ते आपले कर्मचारी आहेत. माध्यमं, नागरिकांचं सर्वांच हे काम आहे की, त्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत.
नीटमध्ये २२ लाख, सीबीएससीत १७ लाख, सीयुईटीमध्ये १६ लाख आणि एसएससी जीडी परीक्षेत ४० लाख तरुणांची थट्टा झाली आहे. हे सर्व मिळून साधारण कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ झाला आहे. त्यानंतर आम्ही कोर्टात जातो, इन्स्टिट्युशन्सकडं जातो तर आमचं तिथं कोणीही ऐकत नाही, आम्हाला सरळ कोकरोच आणि पॅरासाईट बोललं जातं, ही आपली अवस्था आहे, असं यावेळी सौरव दास यानं सांगितलं.
आशुतोष रांकानं म्हटलं की, १ कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य सध्या अधांतरी आहे. इतकं सगळं होऊनही धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा का देत नाहीत. या देशात जबाबदारी नावाची कोणतीही गोष्ट उरलेली नाही. धमेंद्र प्रधान यांच्यासाठी या विद्यार्थ्यांची काहीही किंमत नसेल पण आमच्यासाठी आहे. त्यामुळं ६ जून रोजी आम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहोत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.