Chandigarh News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीसाठी सकारात्मक बातमी आहे. एकीकडे जागावाटपाची चर्चा सुरू असताना काँग्रेस आणि आपमध्ये एका निवडणुकीसाठी आघाडी झाली आहे. ही निवडणूक विधानसभा किंवा लोकसभेची नसली तरी दोन्ही पक्षांनी टाकलेले हे पहिले पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.
इंडिया आघाडीमध्ये (India Alliance) काँग्रेससाठी (Congress) आप हा महत्त्वाचा पक्ष आहे. दिल्ली आणि पंजाबसह इतर काही राज्यांमध्येही 'आप'ने आपले स्थान निर्माण केले आहे. सध्या दोन्ही पक्षांमध्ये लोकसभेच्या (LokSabha) जागावाटपाची चर्चा सुरू असून लवकरच त्यावर अंतिम निर्णय होईल, असे नेत्यांकडून सांगितले जात आहे. मात्र, त्याआधीच दोन्ही पक्षांमध्ये चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीत आघाडी झाली आहे. (Chandigarh Mayor Election)
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवनकुमार बन्सल यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, आप (AAP) महापौरपदाच्या निवडणुकीत आपला उमेदवार उतरवणार असून काँग्रेस उपमहापौरपदाची निवडणूक लढवणार आहे. लोकसभा निवडणुका नंतर आहेत. त्याआधीच आम्ही महापालिकेच्या निवडणुकीत एकत्र आलो आहोत. त्यामुळे आमचे उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास बन्सल यांनी व्यक्त केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महापौरपदाच्या निवडणुकीत 35 नगरसेवक मतदान करणार आहेत. भाजपकडे 14 नगरसेवक आहेत. आम आदमी पक्षाचे 13 आणि काँग्रेसचे सात नगरसेवक आहेत. दोन्ही पक्षांचे मिळून 20 नगरसेवक असल्याने निवडणूक सध्यातरी एकतर्फी वाटत आहे. शिरोमणी अकाली दलाचा एक नगरसेवक आहे. बहुमतासाठी 18 मतांची गरज आहे. या निवडणुकीत भाजपकडूनही जोर लावला जाण्याची शक्यता आहे.
लोकसभेसाठी सकारात्मक संकेत
चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीत झालेली आघाडी काँग्रेस आणि आपसाठी सकारात्मक संकेत मानले जात आहेत. या निवडणुकीत मतांमध्ये फाटाफूट न झाल्यास या आघाडीचे उमेदवार विजयी होतील. हाच पॅटर्न पुढे लोकसभेतही कायम राहिल्यास दोन्ही पक्षांना फायदेशीर ठरू शकतो, अशी चर्चा आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ही निवडणूक 18 जानेवारीला होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.