कोलकता : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीमुळे नागरिक संकटात सापडले आहेत. यामुळे मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले आहे. यानंतर भाजपशासित (BJP)राज्यांनी करात कपात केली होती. विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांनी करात कपात केली नसल्याने टीकेची झोड उठली होती. आता काँग्रेसच्या (Congress) प्रदेशाध्यक्षांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून करकपातीची मागणी केली आहे.
पश्चिम बंगाल (West Bengal) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीररंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, सर्व काँग्रेसशासित राज्यांनी पेट्रोल, डिझेलवरील करात कपात केली आहे. या राज्यांनी कर कमी केल्याने पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी झाल्या असून, जनतेला दिलासा मिळाला आहे. महागाई आणि दरवाढीमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. तुम्हीही आधी अनेकवेळा इंधन दरवाढीचा मुद्दा मांडला आहे. परंतु, किंमत कमी करण्यासाठी तुम्ही काहीही केलेले नाही. केवळ पश्चिम बंगाल राज्यानेच करात कपात केलेली नाही. त्यामुळे ही कपात तातडीने करावी.
मोदी सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) 5 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये कपात केली आहे. यानंतर भाजपची सत्ता असलेल्या राज्यांनी करात कपात केली होती. परंतु, काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांनी करात कपात केली नव्हती. यामुळे भाजपकडून काँग्रेसला लक्ष्य केले जात होते. अखेर काँग्रेसशासित राज्यांनी करात कपात करण्यास सुरवात केली असून, याची सुरवात पंजाबपासून झाली होती. नंतर राजस्थानेही करकपात केली होती.
उत्पादन शुल्क कमी केल्याने केंद्र सरकारला चालू आर्थिक वर्षात 1.4 लाख कोटी रुपयांच्या उत्पादन शुल्कावर पाणी सोडावे लागेल. देशात 3 लोकसभा आणि 30 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या आहेत. यात काही ठिकाणी भाजपला फटका बसला. सर्वाधिक फटका हिमाचल प्रदेशमध्ये बसला होता. हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी जाहीरपणे याचे खापर महागाईवर फोडले होते. याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये भाजपचे चारही उमेदवार पराभूत झाले होते. कर्नाटक आणि हरियानातील प्रतिष्ठेच्या लढतीततही भाजपला हार पत्करावी लागली होती.
पुढील वर्षी 7 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये हिमाचल प्रदेश तर डिसेंबरमध्ये गुजरातमध्ये निवडणूक होत आहे. यातील पंजाब वगळता इतर 6 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा फटका भाजपला बसणार हे पोटनिवडणुकांतून समोर आले आहे. यामुळे केंद्र सरकारनंतर भाजपशासित राज्यांनीही पेट्रोल, डिझेलवरील करात कपात केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.