

तब्बल ५९ वर्षांनंतर तमिळनाडू राज्याच्या सत्तेत काँग्रेसने पुनरागमन केले आहे. मुख्यमंत्री विजय यांच्या मंत्रिमंडळात काँग्रेसच्या २ आमदारांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. आमदार अॅड. राजेशकुमार आणि थिरु पी. विश्वनाथन अशी नव्या मंत्र्यांची नावे आहेत.
गत आठवड्यात मुख्यमंत्री विजय यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध केल्यानंतरच मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर तमिळनाडू मंत्रिमंडळात दोन आमदारांचा समावेश करण्यास काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंजुरी दिली होती.
मात्र राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्याकडे केरळचीही जबाबदारी असून ते मंत्रिमंडळ स्थापनेसाठी केरळमध्ये व्यस्त होते. त्यामुळे त्यांची वेळ मिळू शकत नव्हती. केरळनंतर ते तमिळनाडूमध्ये परत येताच शपथविधीचा मुहूर्त ठरला.
गुरुवारी (२१ मे) लोकभवन येथील समारंभात मुख्यमंत्री विजय यांच्या मंत्रिमंडळात काँग्रेसच्या 2 आमदारांसह एकूण २३ जणांचा शपथविधी संपन्न झाला. विजय यांनी मंत्रिमंडळात काँग्रेसशिवाय अन्य कोणत्याही मित्रपक्षाला स्थान दिलेले नाही.
१९६७ च्या निवडणुकीत झाला होता काँग्रेसचा पराभव :
१९६७ च्या विधानसभा निवडणुकीत सी. एन. अण्णादुराई आणि सुपरस्टार एम. जी. रामचंद्रन यांच्या नेतृत्वाखालील 'द्रविड मुन्नेत्र कळघम' पक्षाने पहिल्यांदा ऐतिहासिक विजय मिळवला होता. स्वातंत्र्यापासून सत्तेत असलेल्या बलाढ्य काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला होता.
१९६७ च्या निवडणुकीत द्रमुकने २३४ जागांपैकी १३८ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले. स्वतः काँग्रेसचे दिग्गज नेते के. कामराज यांचा एका तरुण विद्यार्थी नेत्याकडून (पी. श्रीनिवासन) पराभव झाला. काँग्रेसला तेव्हापासून आजपर्यंत पुन्हा कधीही स्वबळावर सत्ता मिळवता आलेली नाही.
मागच्या 60 वर्षांमध्ये काँग्रेसने अनेकदा द्रमुकसोबत मैत्री करत विधानसभेची निवडणूक लढवली, काही प्रमाणात यशही मिळवले. पण सरकारमध्ये स्थान मिळाले नव्हते. आता मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला काँग्रेसने समर्थन दिल्यानंतर त्यांच्या दोन आमदारांना सरकारमध्ये स्थान देण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.