
New Delhi News : मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात मोठी उलथापालथ होत असल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदार हादरले आहेत. मागील पाच दिवसांत शेअर बाजारात तब्बल 18.64 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. यामागेच कोणतेही एक ठोस कारण नसले तरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही निर्णयांमुळे बाजार पडझड सुरू असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
मागील पाच दिवसांत सेन्सेक्स 2.82 टक्क्यांनी म्हणजेच 2215 अंकानी घसरला आहे. आज एकाच दिवसात सेन्सेक्सची घसरण 1018.20 अंक एवढी होती. तसेच निफ्टीमध्येही मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार हतबल झाले आहेत. प्रामुख्याने लघु आणि मध्यम आस्थापनांचे शेअर कोसळत असले तरी मोठ्या आस्थापनांना फटका बसत आहे.
विदेशी गुंतवणूकदारांकडून 2025 मध्ये आतापर्यंत 88 कोटी 139 लाख रुपये शेअर बाजारातून काढण्यात आले आहेत. त्यामुळे भारतीय शेअर बाजारात घसरण होत असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. परिणामी, मागील पाच दिवसांत मुंबई शेअर बाजारात 18 कोटी 63 लाख 747 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बाजारासाठी मंगळवार घातवार ठरला.
मंगळवारी एकाच दिवशी गुंतवणूकदारांचे तब्बल दहा लाख कोटी रुपये बुडाले. या घसणीमागे अनेक कारणे सांगितली जात असून त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर करवाढ करण्याचा निर्णयही महत्वाचा मानला जात आहे. अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारयुध्द भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्यामुळे महागाईही वाढू शकते.
ट्रम्प यांनी सत्तेत आल्यानंतर अनेक देशांवर अतिरिक्त कर लावण्याची घोषणा केल्यानंतर शेअर बाजाराचे गणित बिघडू लागले आहे. त्यामुळे एकीकडे डॉलर मजबूत होत असताना रुपया कमकुवत होत चालला आहे. त्याचा नकारात्मक परिणाम भारतीय बाजारावर होत आहे. रुपयाची घसरण अत्यंत चिंताजनक मानली जात आहे.
त्याचप्रमाणे अमेरिकी फेडरल रिझर्व्ह बँकेने दरांमध्ये केलेल्या कपातीमुळे गुंतवणूकदार अमेरिकेतील बाजाराकडे आकर्षित झाले असून भारतातील बाजारातील गुंतवणूक काढून घेत आहेत. त्यामुळे भारतात अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. पुढील काही दिवसांत बाजारात हा दबाव कायम राहील, असा अंदाज आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.