'सिरम'च्या कोव्हिशिल्ड लशीबाबत युरोपातील आठ देशांनी घेतला मोठा निर्णय

कोव्हिशिल्ड लस घेतलेल्या व्यक्तींना युरोपियन युनियनचे दरवाजे बंद करण्यात आले होते.
eight countries from europe approve covishield covid vaccine
eight countries from europe approve covishield covid vaccine
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (SII) कोव्हिशिल्ड (Covishield) लशीबाबत नवीन समस्या निर्माण झाली होती. ही लस घेतलेल्या व्यक्तींना युरोपियन युनियनचे (European Union)  दरवाजे बंद करण्यात आले होते. आता या लशीबाबत युरोपातील आठ देशांनी मोठा निर्णय घेतला आहे. या देशांनी कोव्हिशिल्डचा समावेश मंजुरी मिळालेल्या लशींमध्ये केला आहे. 

युरोपियन युनियनमधील जर्मनी, स्लोव्हानिया, ऑस्ट्रिया, ग्रीस, आईसलँड, आयर्लंड, स्पेन आणि स्वित्झर्लंड या देशांनी आता कोव्हिशिल्डला मंजुरी दिली आहे. यामुळे कोव्हिशिल्ड लस घेतलेल्या नागरिकांना या देशांमध्ये मुक्तपणे प्रवास करता येणार आहे. युरोपियन युनियनच्या नवीन व्हॅक्सिन पासपोर्ट योजनेत कोव्हिशिल्डचा समावेश नाही. 1 जुलैपासून युरोपियन युनियनने डिजिटल कोव्हिड सर्टिफिकेट योजना सुरू केली आहे. 

नव्या योजनेअंतर्गत कोरोना लस घेतलेल्या नागरिकांना युरोपियन युनियनमध्ये मुक्तपणे कुठेही प्रवास करता येत आहे. संबंधित व्यक्तीने कोरोना लस घेतली आहे, तो निगेटिव्ह चाचणी केलेला अथवा कोरोनातून बरा झालेला याचा पुरावा हे प्रमाणपत्र पुरावा असेल. युरोपियन युनियनच्या बाहेरील व्यक्तींना हे प्रमाणपत्र सदस्य देशांममध्ये प्रवास करण्यासाठी आवश्यक असेल. 

या योजनेत कोव्हिशिल्डचा समावेश नसल्याने ही लस घेतलेल्या व्यक्तींना युरोपियन युनियनमध्ये प्रवास करता येणार नाही. त्यांना प्रवास करण्यासाठी अनेक बंधने असतील. त्यांना विलगीकरणात राहावे लागेल अथवा प्रत्येक देशांतील नियमांप्रमाणे उपाययोजना कराव्या लागतील. आता युरोपियन युनियनमधील आठ देशांनी कोव्हिशिल्ड मंजुरी दिली असून, लवकरच युरोपियन युनियनकडूनही परवानगी मिळण्याची शक्यता आहे.     

युरोपियन युनियने कोव्हिशिल्डला मंजुरी न दिल्याबद्दल सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावालांनी खुलासा केला होता.  त्यांनी म्हटले होते की, युरोपियन युनियनमध्ये प्रवास करताना कोव्हिशिल्ड लस घेतलेल्या भारतीयांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. युरोपियन युनियनच्या नव्या व्हॅक्सिन पासपोर्ट योजनेत अॅस्ट्राझेनेका आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने विकसित केलेली आणि सिरमने उत्पादित केलेली कोव्हिशिल्ड लस नाही. मी हा मुद्दा उच्च स्तरीय पातळीवर उपस्थित केला आहे. नियामक आणि राजनैतिक पातळीवर सर्व  देशांशोबत यावर लवकरच तोडगा निघेल. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. आता केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. स्पुटनिकचे उत्पादन डॉ.रेड्डीज ही कंपनी करीत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  

Edited by Sanjay Jadhav 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com