

Delhi News : शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गट व ठाकरे गटाकडून एकमेकांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीत. एकीकडे शिवसेना कुणाची, १६ आमदार अपात्र की पात्र? यावर सुप्रीम कोर्टात व विधान भवनात सुनावणी सुरू असताना दुसरीकडे ठाकरे गटाला कोंडीत पकडण्याची तयारी शिंदे गटाने सुरू केली आहे.
संसदेत महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देण्याच्या भूमिकेनंतर खासदार विनायक राऊत, ओमराजे निंबाळकर, राजन विचारे आणि संजय जाधव यांना नोटीस पाठवून कारवाई केली जाईल, असे शिंदे गटाने पत्रद्वारे सूचित केले आहे. त्यामुळे येत्या काळात या विरोधात ठाकरे गटाकडून काय रणनीती आखली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने संसदेचं विशेष अधिवेशन बोलावले होते. या अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले. त्यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या लोकसभेच्या प्रतोद भावना गवळी यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी १४ सप्टेंबरला व्हिप काढला होता. महिला आरक्षण विधेयकाच्या बाजूने शिवसेना खासदारांनी मतदान करावं, असं गवळी यांनी व्हिपद्वारे सांगितले होते. मात्र, विनायक राऊत, राजन विचारे, ओमप्रकाश निंबाळकर, संजय जाधव यांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केलेले नाही. त्यामुळे शिंदे गटाने यासंदर्भात कायदेशीर बाजू तपासण्यास सुरुवात केली आहे.
संसदेत गैरहजर राहणाऱ्या या चारही खासदारांना एक नोटीस पाठवण्यात येणार असल्याची माहिती शिंदे गटाने एका पत्रकाद्वारे दिली आहे. विशेष म्हणजे, ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अद्याप यासंदर्भात भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे येत्या काळात ठाकरे गटाकडून या शिंदे गटाच्या नोटिशीला कशा प्रकारे सामोरे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे