

PM Modi Big Announcement : दिल्लीच्या जंतर-मंतर इथं कॉक्रोच जनता पार्टीच्यावतीनं झालेल्या आंदोलनात आणि मोर्चामध्ये सहभागी झालेल्या जेन झी तरुणांवर केंद्र सरकारसह विविध राज्य सरकारांनी गुन्हे दाखल करायला सुरुवात केली आहे. याविरोधात देशभरात नाराजीचा सूर आहे, त्याचबरोबर विरोधकांनी देखील यावरुन सरकारला पावसाळी अधिवेशनात टार्गेट केलं आहे.
यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मध्यरात्री साडे अकराच्या सुमारास सोशल मीडियावर रीलच्या माध्यमातून या तरुणांच्या कृतीबाबत त्यांना माफ करत असल्याचं तसंच समाजानं देखील त्यांना माफ करावं अशी आशा व्यक्त केली. मोदींच्या या आवाहनानंतर महाराष्ट्र शासनानं देखील रात्रीतूनच एक पत्रक काढत या आंदोलनातील सर्व प्रकारचे गुन्हे मागे घेण्यात येत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं खरंतर सीजेपीच्या आंदोलकांसाठी ही खूशखबर ठरली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रीलमध्ये म्हटलं की, "हाय फ्रेन्ड्स आज तुमच्याशीच गप्पा माराव्याशा वाटत आहेत. जंतर-मंतरवर जे काही झालं ते देशानं आणि जागानं पाहिलं आहे. काही खोडकर मुलांनी वाईटातील वाईट शिव्या दिल्या. कोणत्याही सभ्य समाजाला शोभा देणार नाही अशा शब्दांचा वापर यात केला गेला. यामध्ये मला तर शिव्या दिल्याच पण माझ्या आईला देखील शिवीगाळ केली गेली. हे खूपच वाईट प्रकारचं कृत्य होतं. पण मी आज बोलू इच्छितो की, बालपणात चुका होतातच, तसंच याच बालपणातच चुका सुधारण्याची संधी देखील असते. हेच तर बालपण असतं. त्यामुळंच मी सामाजात जो आक्रोश आहे त्याला समजू शकतो.
पण एक सांस्कृतीक धक्का देखील आहे की आमच्या मुली अशा पद्धतीची भाषा कशी काय बोलू शकतात. पण वेळ आहे, या मुलांशी गळाभेट घेत त्यांना मार्ग दाखवण्याचा. ही भरकटलेली मुलं आहेत त्यांना मार्ग दाखवणं हे आपलं काम आहे. त्यांना शिक्षा देणं, कोर्टाच्या पायऱ्या घासायला लावणं आणि समाजात त्रास देणं यामुळं परिस्थिती बदलू शकणार नाही. मी त्यांना माफ करु इच्छितो, समाजानं देखील हे स्विकारावं. कधी कधी आपल्या दाताखाली जीभ येते त्यातून रक्तही येतं. पण त्यामुळं आपण दात तोडत नाही. त्याचप्रमाणं ही मुलं आपली आहेत, त्यांना मार्ग दाखवणं हे आपलं काम आहे. भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं कठीण काम आहे पण हे कठीण काम करणं गरजंचं आहे. त्यामुळं मी या मुलांन आवाहन करतो की त्यांना आमच्यासोबत यावं आणि देशासाठी सोबत चालत राहू. आपल्या चुकांमधूनही शिकत राहू, देश पुढे चालला आहे चालत राहील. तसंच तुम्हीही पुढे जात राहावं अशी माझी इच्छा आहे. मी तुमच्यासाठी जगतो आहे तुमच्या उज्वल भविष्यासाठी काम करतो आहे. त्यामुळं आपण मिळून देशाला पुढे नेत राहू. धन्यवाद मित्रांनो"
दरम्यान, पंतप्रधानांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्र शासनानं देखील रात्री उशीरा आंदोलक तरुणांवरील गुन्हे मागे घेण्यात येत असल्याचं एक गोपनिय पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. यामध्ये म्हटलं की, दिल्लीतील जंतर-मंतर इथं NEET (UG) परीक्षेमधील कथित अनियमिततेविरुद्ध झालेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ राज्यातील विविध शहरे व जिल्ह्यांमध्ये झालेल्या आंदोलनात सहभागी विद्यार्थी, तरुण व इतरांवर दाखल गुन्हे विहीत मार्गानं मागे घेण्याबाबतचा निर्णय शासनानं घेतला आहे.
१) आंदोलनात सहभागी झालेल्या कोणत्याही विद्यार्थी, तरुण व इतर व्यक्तींविरोधात कोणतीही प्रतिकूल कायदेशीर किंवा दंडात्मक कारवाई करण्यात येऊ नये.
२) राज्यात या आंदोलनात सहभागी विद्यार्थी, तरुण व इतर व्यक्तींविरोधात दाखल झालेले गुन्हे, खटले मागे घेण्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया तात्काळ पूर्ण करुन पुढील आवश्यक ती कार्यवाही करावी, ही विनंती.
महाराष्ट्र शासनाचे सहसचिव राजेंद्र होळकर यांच्या नावानं हे पत्रक महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना लिहिण्यात आलेलं आहे. ३१ जुलै २०२६ ही तारीख या पत्रावर आहे. त्यामुळं राज्याच्या पोलीस महासंचालकांना हे पत्र लिहिलेलं असल्यानं संपूर्ण राज्यभरात ज्या शहरांमध्ये आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यांच्यावरील गुन्हे आता मागे घेण्यात येणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.