Chandigarh : हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांचे पुतणे रमित खट्टर यांनी गुरूवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मनोहरलाल खट्टर यांनी फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
काँग्रेसचे रोहतक विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भूषण बत्रा यांच्या उपस्थित रमित काँग्रेसमध्ये दाखल झाले. हा पक्षप्रवेश भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रमित खट्टर हे मनोहरलाल खट्टर यांचे बंधू जगदीश यांचे पुत्र आहेत.
खट्टर हे केंद्रीय मंत्री असले तरी राज्यात अजूनही त्यांचा दबदबा आहे. त्यामुळे पुतण्याला पक्षात आणत काँग्रेसने मोठी खेळी खेळली आहे. 2020 मध्ये विभागीय वन अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणात रमित यांचेही नाव आले होते. त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता.
हरियाणा युवक काँग्रेसकडून रमित यांच्या पक्ष प्रवेशाची माहिती देण्यात आली. युवक काँग्रेसने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मनोहरलाल खट्टर यांचे पुतणे रमित खट्टर यांनी आज काँग्रेसचे सदस्यत्व घेतले. काँग्रेसमध्ये त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
राज्यात पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनेही भाजपचा पराभव करून पुन्हा राज्यात सत्ता मिळवण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. तर दुसरीकडे आम आदमी पक्षानेही आव्हान उभे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आप आणि काँग्रेसमध्ये आघाडी न झाल्याने बहुतेक मतदारसंघात तिरंगी किंवा चौरंगी लढत होणार आहे.
राज्यात 90 जागांसाठी 5 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर 8 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. याच दिवशी जम्मू आणि काश्मीरचीही मतमोजणी आहे. काश्मीरमध्ये तीन टप्प्यांत मतदान होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.