

Independence Day Special: १५ ऑगस्ट १९४७ हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन आहे, हे सर्वांना ठाऊकच आहे. पण या तारखेवरुन एका ज्योतिष्यानं सांगितलेल्या अशुभ वार्तेमुळं निर्माण झालेला पेचप्रसंग काय होता. त्यावर नियोजित पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी कसा तोडगा काढला याचा किस्सा जाणून घेऊयात.
भारत स्वतंत्र झाला म्हणजे तो ब्रिटशांच्या अंमलातून मुक्त झाला होता. भारतावरील ब्रिटिशांची सत्ता कायमची संपुष्टात येणार होती. पण ब्रिटिशांकडून भारतीयांकडं राजकीय सत्तेची सुत्रं देण्याची जबाबदारी ब्रिटिश भारतातील शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांच्यावर सोपवण्यात आली होती. भारतातील त्यावेळच्या काँग्रेस या एकमेव जबाबदार संघटनेकडं त्यादृष्टीनं वाटाघाटी सुरु होत्या. भारताला स्वातंत्र्य बहाल करण्याचा दिवस आधी जून १९४८ मध्ये ठरला होता. पण लॉर्ड माऊंटबॅटन यांनी ऑल इंडिया रेडियोवरुन ४ जून १९४७ रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत घोषणा केली होती की, ब्रिटिशांकडून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतीयांच्या हाती सत्ता सोपवली जाईल. ही पत्रकार परिषद आणि त्यातील तारखेची घोषणा त्यावेळच्या कलकत्ता येतील स्वामी मदानंद या ज्योतिषींनी ऐकली आणि ते अविश्वासनं ओरडले होते, "हे त्यांनी काय केले! हे त्यांनी काय केले!" देश ज्या क्षणाची वाट पाहत होता त्याची घोषणा झालेली असताना आणि तो वर्षभर आधीच स्वतंत्र होणार असतानाही स्वामी मदानंद मात्र आनंदी नव्हते. त्यांच्यासाठी, ही तारीख केवळ कॅलेंडरवर लिहिलेली नव्हती तर ती ग्रहांच्या स्थितीत (नक्षत्रांमध्ये) लिहिलेली होती आणि आपल्या कुंडल्यांची पडताळणी केल्यानंतर त्यांना ते अत्यंत अशुभ वाटत होतं. यावेळी त्यांना ग्रह-तारे १५ ऑगस्ट १९४७ या दिवसासाठी (सुर्योदयानंतर) अनुकूल नाहीत असं वाटत होतं.
भारताच्या स्वातंत्र्यदिनाची बातमी पसरताच, कलकत्ता, बनारस (आताचे वाराणसी) आणि दक्षिण भारतातील काही भागांतील ज्योतिषी आपापल्या ज्योतिषी तक्त्यांच्या आधारे या तारखेची छाननी करू लागले. त्या वर्षी १५ ऑगस्ट हा शुक्रवार होता. कुंडल्या मांडल्या गेल्या, ग्रहांच्या स्थितीचा अभ्यास केला गेला आणि भारताच्या जन्मासाठी (स्वातंत्र्यप्राप्तीसाठी) प्रस्तावित असलेल्या वेळेची बारकाईने तपासणी केली गेली. सर्व ज्योतिषी ज्या निष्कर्षाप्रत पोहोचले होते की, ज्या दिवशी भारत स्वतंत्र होणार होता, ती तारीख कथितरित्या 'अशुभ' होती. राजकारण्यांनी दिवस तर निवडला होता, पण आता ज्योतिषी त्या विशिष्ट वेळेबद्दल (मुहूर्ताबद्दल) चिंतेत होते. स्वातंत्र्याची तारीख बदलता येण्यासारखी नव्हती; पण कदाचित ज्यावेळी भारत स्वतंत्र होणार होता, ती वेळ मात्र बदलता येऊ शकत होती.
एखाद्या राष्ट्राच्या जन्मासाठी ती तारीख शुभ नाही, असं मत ज्योतिषांनी व्यक्त केल्यामुळं, लोकांची अस्वस्थता दूर करण्यासाठी एक मार्ग शोधणे गरजेचं होतं. कारण तो दिवस सर्वांनी आशेनं साजरा करायचा होता. अशावेळी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान बनणारे नेते पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी यावर तोडगा काढला आणि त्यानंतर भारताला १५ ऑगस्टच्या मध्यरात्री स्वातंत्र्यप्राप्त होईल असं निश्चित केलं. आपल्या ऐतिहासिक भाषणात ते म्हणाले होते की, "मध्यरात्रीच्या ठोक्या सरशी, जेव्हा जग झोपलेलं असेल, तेव्हा भारत नवजीवन आणि स्वातंत्र्यासाठी जागा झालेला असेल" हाच नेहरुंचा ज्योतिषालाही हरवणारा मास्टरस्ट्रोक होता.
माऊंटबॅटन आणि भारतीय नेत्यांनी देशाच्या फाळणीची घोषणा केली होती. १९४७च्या उन्हाळ्यापर्यंत, ब्रिटननं हे मान्य केलं होतं की भारतातील त्यांची सत्ता आता संपुष्टात येत आहे. त्यामुळं लंडनसमोरचा प्रश्न आता 'भारतातून निघून जावे की नाही' हा नव्हता, तर 'या देशात अराजकता माजण्यापूर्वी माघार घेणे शक्य आहे का?, हा होता, असं ऐतिहासिक नोंदीमध्ये सांगितलं जातं.
'फ्रीडम ॲट मिडनाईट' (Freedom at Midnight) या पुस्तकात फ्रेंच लेखक डॉमिनिक लॅपियर आणि अमेरिकन पत्रकार लॅरी कॉलिन्स यांनी त्या अंतिम महिन्यांतील वातावरणाचं चित्रण केलं आहे. अनेक दशकांच्या राष्ट्रवादाच्या संघर्षानंतर, ब्रिटनसमोर एकच पर्याय उरला होता, असं ते या पुस्तकात लिहितात. त्यानुसार, "इतिहास आणि सशस्त्र बंडाच्या रेट्यामुळं हाकलले जाण्यापेक्षा, योग्य वेळी भारताबाहेर पडणे हे ब्रिटिश सत्तेच ध्येय होतं" कारण सत्ता हस्तांतरणाचा निर्णय झाला होता, पण माऊंटबॅटन यांच्या हाती आलेला भारत हा विभाजनाच्या उंबरठ्यावर उभा असलेला देश होता.
काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात राजकीय कोंडी निर्माण झाली होती. काँग्रेसला अखंड भारत हवा होता. मोहम्मद अली जिना यांना वाटत होतं की, तडजोडीची वेळ निघून गेलेली आहे. 'फ्रीडम ॲट मिडनाईट' या पुस्तकानुसार, जिना यांना "त्वरित शस्त्रक्रिया (surgical operation) हवी होती, आणि शस्त्रक्रिया म्हणजे भारताची फाळणी. "३ जून १९४७ रोजी माऊंटबॅटन, जवाहरलाल नेहरू, मोहम्मद अली जिना आणि बलदेव सिंग यांनी 'ऑल इंडिया रेडिओ'वरून देशाला संबोधित केलं. माऊंटबॅटन योजनेनुसार, ब्रिटिश भारताची भारत आणि पाकिस्तान या दोन अधिराज्यांमध्ये (डॉमिनियन्समध्ये) विभागणी केली जाणार होती आणि मूळची जून १९४८ची अंतिम मुदत गाठण्याआधीच सत्ता हस्तांतरित केली जाणार होती," असं लॅपियर आणि कॉलिन्स यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे.
३ जून १९४७ रोजी माऊंटबॅटन यांचं चर्चा पूर्ण झाली नव्हती. त्यामुळं दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी अचानक एक पत्रकार परिषद बोलावली. त्यानंतर जे घडलं त्यानं सर्वांनाच, अगदी वाटाघाटींवर बारकाईनं लक्ष ठेवणाऱ्यांनाही, थक्क केलं. सत्ता हस्तांतरणासाठी ब्रिटिश जून १९४८ पर्यंत वाट पाहणार नव्हतं. माऊंटबॅटन यांनी १५ ऑगस्ट १९४७ ही निश्चित तारीख जाहीर केली. या दिवशी ब्रिटिश भारत सोडून जातील असं भारतीयांना सांगण्यात आलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.