सिंघम आयपीएसच्या वर्दीवर एका 'थप्पड'मुळे लागणार डाग

सर्वांत कमी वयात पोलीस अधीक्षक होण्याचा बहुमान पटकावणारे आणि आपल्या कामामुळे सिंघम म्हणून प्रसिद्ध असणारे गौरवसिंह आता अडचणीत आले आहेत.
ips gaurav singh slaps chief minister security in charge in kullu
ips gaurav singh slaps chief minister security in charge in kullu
Published on: 
Updated on: 

कुलू : हिमाचल प्रदेशचे (Himachal Pradesh) मुख्यमंत्री जयराम ठाकूर (CM Jairam Thakur) यांचे सुरक्षा प्रमुख बृजेश सूद आणि कुलूचे (Kullu) पोलीस अधीक्षक (SP) गौरवसिंह (Gaurav Singh) यांच्यात जोरदार हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सर्वांत कमी वयात पोलीस अधीक्षक होण्याचा बहुमान पटकावणारे आणि आपल्या कामामुळे सिंघम म्हणून प्रसिद्ध असणारे गौरव आता अडचणीत आले आहेत. या थप्पड प्रकरणामुळे त्यांच्या आतापर्यंतच्या कामगिरीवरच डाग लागला आहे. 

राज्यात सर्वांत कमी वयात पोलीस अधीक्षक बनण्याचा मान गौरव यांनी पटकावला होता. ते 2013 च्या बॅचचे आयपीएस आहेत. आपल्या बेधडक आणि प्रामाणिक कामामुळे ते राज्यभरात सिंघम म्हणून लोकप्रिय आहेत. त्यांनी आधी खाणकाम आणि अमली पदार्थ माफियांच्या विरोधात केलेली कारवाई खूप गाजली होती. त्यामुळे ते जनतेत लोकप्रिय ठरले होते. त्यांना कुलूचे पोलीस अधीक्षक नेमावे, अशी मागणी जनतेतूनच होत होती. 

गौरवसिंह हे मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत. त्यांचा जन्म 1 जुलै 1990 रोजी आग्र्यातील एका सामान्य परिवारात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बी.सिंह आणि आईचे नाव किरणदेवी आहे. याआधी गौरव हे शिमला, बद्दी आणि कांगडा येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक होते. नंतर त्यांची कुलुच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली. 

काँग्रेसच्या माजी आमदाराच्या पत्नीच्या गाडीला त्यांनी दंड केल्याने ते खूप चर्चेत आले होते. या प्रकरणी त्यांच्या बदलीसाठी दबाव आणण्यात आला होता. परंतु, गौरव यांनी कारवाई करणे सुरुच ठेवले होते. नंतर त्यांची कांगडा येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. 

प्रामाणिक असणारे गौरव हे बेशिस्त खपवून घेणारे नाहीत. त्यांनी आतापर्यंत 26 पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांच्यावर बेशिस्त दाखवल्याप्रकरणी कारवाई केली आहे. त्यांना याआधी पोलीस महासंचालक सन्मानही मिळाला आहे. परंतु, कालच्या थप्पड प्रकरणामुळे अशा प्रामाणिक आणि शिस्तशीर अधिकाऱ्याच्या वर्दीवर डाग लागला आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com