India Ships Allowed Amid US Israel War : इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक व्यापार आणि सागरी मार्गात मोठा तणाव निर्माण झाला आहे. या युद्धामुळे अनेक देशांमध्ये तेलाचा आणि गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
कारण इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून तेलाच्या जहाजांची वाहतूक बंद केल्यामुळे जगभरात इंधनाचा तुडवडा निर्माण झाला आहे. मात्र, अशातच आता भारताला इराणकडून सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. कारण परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री सैयद अब्बास अराघची यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
या दोन्ही नेत्यांच्या संभाषणानंतर इराणने भारतीय जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्गाने जाण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता मागील काही दिवसांपासून युद्धामुळे इंधनाची टंचाई निर्माण होण्याची जी भीती व्यक्त केली जात होती ती आता दूर झाली आहे.
इराण आणि इस्राइस-अमेरिकेतील संघर्षामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून इंधन पुरवठा करणाऱ्या मार्गांवर मोठा तणाव निर्माण झाला आहे. या सागरी मार्गाने जगभरातील अनेक देशांना इंधनाचा पुरवठा केला जातो. मात्र, इराणने इथून वाहतूक करण्यास बंदी घातली होती.
मात्र, आता इराणी अधिकाऱ्यांनी भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे जाण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केल्यापासून होर्मुझच्या सामुद्रधुनीतील सागरी वाहतूक ठप्प झाली होती. ती आता भारतासाठी खुली होणार आहे.
दरम्यान, ही सूट केवळ भारतासाठी दिली असून इराणने अद्याप अमेरिका, युरोप आणि इस्रायलच्या अनेक जहाजांना या सागरी मार्गावरून जाण्याची परवानगी दिलेली नाही आणि त्यांच्यावर कडक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे अशा युद्धजन्य परिस्थितीत भारतासाठी ही सूट खूप महत्त्वाची मानली जात आहे.
तर इराणने हे अमेरिका, युरोप आणि इस्रायलच्या जहाजांवर लादलेले निर्बंध सध्या कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तर इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स (IRGC) नौदलाच्या कमांडरनी याआधीच होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांना इराणची परवानगी घ्यावी लागेल अन्यथा, ते इराणी हल्ल्यांचे लक्ष्य बनू शकतात, असा इशारा दिला आहे.
इराण आणि ओमानच्या किनारपट्टीला वेगळ्या करणाऱ्या या अरुंद सागरी मार्गातून दररोज २ कोटी बॅरलहून अधिक कच्चे तेलाच्या जहाजांची ये-जा होते. सागरी मार्गाने होणाऱ्या एकूण तेल व्यापाराच्या जवळपास एक चतुर्थांश वाहतूक या मार्गाने होते. त्यामुळे या प्रवाहावर काही बंधने किंवा अडचणी आल्या तर त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होतो.
दरम्यान, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या पर्शियन गल्फ क्षेत्रात २८ भारतीय ध्वज असलेली जहाजे कार्यरत असून यापैकी २४ जहाजे होर्मुझ सामुद्रधुनीच्या पश्चिमेला आहेत. तर या जहाजांवर ६७७ भारतीय खलाशी आहेत तर पूर्वेला असलेल्या चार जहाजांवर १०१ भारतीय खलाशी आहेत. त्यामुळे भारताच्या ऑईल डिप्लोमसीला यश आल्याने हजारो कोटींचा माल इराणच्या होर्मुझच्या खाडीतून सोडवल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाय हे जहाज तिथून सुखरूप आणण्यासाठी भारताचा ध्वज तिरंगा हा पासवर्ड ठरला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.