Israel Lebanon Ceasefire : अमेरिका आणि इराणमध्ये शस्त्रसंधी जाहीर होताच इस्रायलने लेबनॉनवर मोठे हल्ले केले. शिवाय अमेरिका आणि इराणमधील शांती करारात लेबनॉनचा समावेश नसल्याचा दावा केला होता. त्यानंतर इराणने देखील आक्रमक भूमिका घेत लेबनॉनवरील हल्ले थांबवले तरच शस्त्रसंधी करू असं अमेरिकेला ठणकावलं होतं.
त्यामुळे अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा उफाळण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, अशातच आता थेट इस्रायल आणि लेबनॉनने 10 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमती दर्शवल्याची मोठी माहिती समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
"लेबनॉनचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ औन आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासोबत झालेल्या अत्यंत सकारात्मक चर्चेनंतर युद्धविरामाचा निर्णय घेण्यात आला आहे," असं ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट करत सांगितलं आहे.
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील युद्धविराम ईएसटी वेळेनुसार दुपारी ५ वाजता (भारतीय वेळेनुसार पहाटे 3:30 वा.) सुरू होईल, असा दावा केला आहे. तर दोन्ही देशांमधील शांतता प्रक्रियेच्या दिशेने हे पहिले पाऊल असून जगातील 9 युद्धे थांबवण्याचा बहुमान मला मिळाला आहे असून हे माझे 10 वे यश असेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
शिवाय ट्रम्प यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला वॉशिंग्टनमध्ये दोन्ही देशांच्या प्रतिनिधींसोबत महत्वाची बैठक पार पडली असून गेल्या 34 वर्षांतील या दोन देशांमधील ही पहिलीच भेट होती. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्या उपस्थितीत ही महत्त्वपूर्ण चर्चा पार पडल्याचंही ट्रम्प यांनी सांगितलं.
तर शांतता चर्चेसाठी जोसेफ औन आणि बेंजामिन नेतान्याहू यांना हाऊसमध्ये आमंत्रित करणार असल्याचंही ट्रम्प यांनी सांगितलं आहे. तसंच दोन्ही बाजूंना शांतता हवी आहे आणि मला वाटतं ते लवकर होईल, असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्यामुळे आता लवकरच या दोन्ही देशांमधील संघर्ष संपुष्टात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, इस्त्रायलकडून लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर केलेल्या हल्ल्यांमुळं लेबनॉनचं मोठं नुकसान झालं आहे. इस्त्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 2196 नागरिकांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. ज्यामध्ये 260 महिला आणि 172 मुलांचा समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.