Voting Day : जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदानाला मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत 65 टक्क्यांहून अधिक मतदान झाले असून हा आकडा 70 टक्क्यांपेक्षा पुढे जाऊ शकते. मागील दहा वर्षानंतर विधानसभेसाठी पहिल्यांदाच मतदान होत असल्याने मतांचा वाढलेला टक्का कुणाला दणका देणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील 40 विधानसभा मतदारसंघात मतदान होत आहे. भाजप, काँग्रेस व नॅशनल कॉन्फरन्स, पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी या तीन प्रमुख पक्षांमध्ये थेट लढत होत आहे. पहिल्या दोन टप्प्यांमध्येही मतदारांचा चांगला प्रतिसाद होता. मतदानासाठी कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली असून आतापर्यंत कोणताही अनुचित प्रकार समोर आलेला नाही.
सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान उधमपूर जिल्ह्यातील मतदारसंघात झाले आहे. या जिल्ह्याची टक्केवारी तब्बल 73 टक्के एवढी आहे. त्याचप्रमाणे सांबा आणि कठुआ मतदारसंघातील आकडाही 70 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. बांदीपोर, जम्मू आणि कुपवाडा मतदारसंघातही मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या जिल्ह्यात पाच वाजेपर्यंत 65 टक्क्यांच्या जवळपास मतदान झाले आहे.
जम्मू आणि काश्मीरमध्ये 2014 मध्ये जवळपास 66 टक्के मतदान झाले होते. यावेळी हा आकडा ७० टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. कलम 370 हटवल्यानंतर जम्मू आणि काश्मीरपासून लडाख वेगळे करण्यात आले. दोन्ही प्रदेशांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. या निवडणुकीत दोन्ही मुद्दे चांगलेच तापले होते. त्यामुळे मतदारांचा वाढलेला टक्का कुणाच्या बाजूने कौल देणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी मतदारांचा हा उत्साह पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांना मिळालेले यश आणि लोकशाही दर्शवत असल्याचे म्हटले आहे. तर काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी कलम 370 हटवल्याच्या निर्णयाविरोधात हे मतदान असल्याचा दावा केला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.