
Serious Allegations Against High Court Judge : दिल्ली हायकोर्टात न्यायमूर्ती असताना कॅश कांडमध्ये चर्चेत आलेले अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्याविरोधात लोकसभेत महाभियोग प्रस्ताव स्वीकारण्यात आला आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या प्रस्तावाचे लोकसभेत वाचन करत तीन सदस्यीय समितीही स्थापन केली आहे.
सत्ताधारी व विरोधी पक्षातील 146 खासदारांच्या सह्या असलेला महाभियोगाची मागणी करणारा प्रस्ताव अध्यक्ष बिर्ला यांच्या कार्यालयाकडे काही दिवसांपूर्वी सादर करण्यात आला होता. आज त्यांनी लोकसभेत हा प्रस्ताव स्वीकारला. न्यायाधीश चौकशी अधिनियम 1968 मधील कलम 3 मधील उपकलम 2 अनुसाह त्यांनी न्यायमूर्ती वर्मा यांना पदावरून हटविण्याच्या मागणीच्या अनुषंगाने तीन सदस्यीन चौकशी समिती नियुक्त केली आहे.
समितीमध्ये सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती अरविंद कुमार, मद्रास हायकोर्टातील सदस्य मनिंद्र मोहन श्रीवास्तव आणि कर्नाटक हायकोर्टातील वरिष्ठ विधिज्ञ बी. व्ही. आचार्य असतील. ही समिती कॅश कांड प्रकरणाची चौकशी करून लोकसभा अध्यक्षांना अहवाल सादर करेल. तोपर्यंत महाभियोग प्रस्तावाबाबतची प्रक्रिया सुरू राहणार आहे.
महाभियोग प्रक्रियेतील समितीचा अहवाल सर्वात महत्वाचा भाग आहे. अहवालामध्ये न्यायमूर्ती वर्मा यांना दोष धरण्यात आल्यास महाभियोग प्रस्तावावर संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चा होईल. चर्चेनंतर दोन्ही सभागृहात मतदान होईल. एकूण सदस्यसंख्येच्या प्रमाणात बहुमत किंवा उपस्थित आणि मतदान करणाऱ्या खासदारांचे दोन तृतियांश बहुमत प्रस्तावाच्या बाजूने असल्यास हा प्रस्ताव मंजूर होईल. दोन्ही सभागृहांमध्ये हा प्रस्ताव मंजूर होणे आवश्यक असते.
न्यायमूर्ती वर्मा यांची ऑक्टोबर 2021 मध्ये दिल्ली हायकोर्टात अलाहाबाद हायकोर्टातून बदली करण्यात आली होती. यावर्षी 14 मार्चला त्यांच्या दिल्लीतील सरकारी निवासस्थानी आग लागली होती. या घटनेनंतर त्यांच्या घरात अर्धवट जळालेल्या अवस्थेत नोटांचे ढीग आढळून आले होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सुप्रीम कोर्टाने समिती स्थापन केली होती. समितीने न्यायमूर्ती वर्मा यांच्यावर ठपका ठेवला होता. यादरम्यान त्यांची अलाहाबाद हायकोर्टात बदली करण्यात आली. सध्या ते याच हायकोर्टात कार्यरत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.