Karnataka CM : मुख्यमंत्रिपदाचा कर‘नाटकी’ घोळ! सिद्धरामय्या–शिवकुमार आमनेसामने, काँग्रेसची कोंडी

Congress Leadership : कर्नाटकात सिद्धरामय्या - शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून तीव्र रस्सीखेच सुरू असून, रोटेशन कराराच्या चर्चेमुळे काँग्रेस नेतृत्व कोंडीत सापडले आहे.
CM Siddaramaiah Vs DK Shivakumar
CM Siddaramaiah Vs DK ShivakumarSarkarnama
Published on
Updated on

Karnataka CM Crisis : मुख्यमंत्री बदलावरून कर्नाटकात दोन महिन्यांहून अधिक काळ गोंधळ सुरू आहे. मुख्यमंत्रिपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर सत्तेवरील मांड बळकट करत सिद्धरामय्या यांनी लोकप्रियता वाढविली. जंगजंग पछाडूनही उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्रिपद मिळेना. सरकारला अडीच वर्षे झाल्यानंतर शिवकुमार यांना मुख्यमंत्रिपदाचे डोहाळे अतितीव्र झाले आहेत. आता यात काँग्रेस श्रेष्ठींची सर्व बाजूंनीच कोंडी झाली आहे.

कर्नाटकसंदर्भात काँग्रेस श्रेष्ठींची सर्वांत मोठी कोंडी अशी झाली आहे, की सिद्धरामय्या यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा तर इतर मागासवर्गीय नाराज होणार अन् सिद्धरामय्या यांना कायम ठेवले तर राज्यातील दुसरा प्रबळ समाजगट वक्कलिग नाराज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतरही शिवकुमार यांना मुख्यमंत्रिपद दिले, तर राज्यातील पहिल्या क्रमांकाचा लिंगायत समाज गप्प बसणार नाही. अशा अनेक संकटात काँग्रेस सापडली आहे.

यात कहर म्हणजे शिवकुमार भाजपशी संधान साधत आहेत काय, या संशयाने काँग्रेस श्रेष्ठींच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. भाजपचे तत्कालीन मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि बसवराज बोम्मई यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली. येडियुराप्पा यांना जमीन ‘डिनोटिफिकेशन’ प्रकरणी तुरुंगात जावे लागले. तर सरकारच्या प्रत्येक कंत्राटी कामात तब्बल ४० टक्के ‘कमिशन’ घेत असल्याच्या आरोपामुळे बोम्मई यांची कारकीर्दही डागाळली. त्यामुळे जनता भाजप सरकारला कंटाळली होती. त्यातूनच जनतेला एकच आशेचा किरण दिसत होता. मग काय मतदारांनी काँग्रेसला बहुमताने जिंकून दिले.

सिद्धरामय्या-शिवकुमार रस्सीखेच

काँग्रेसने 2023 च्या विधानसभा निवडणूक ही सिद्धरामय्यांच्या नेतृत्वाखाली लढवणार असल्याचे आधीच जाहीर केले होते. मागील 2013-18 या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात सिद्धरामय्या यांनी राबवलेल्या योजनांचा गवगवा झाला. अन्नसुरक्षा योजना, तसेच गरिबांना दारिद्र्यातून बाहेर काढण्यासाठी केलेले काम यामुळे सिद्धरामय्या यांचं वजन काँग्रेसमध्ये वाढले. त्यातून विधानसभा निवडणुकीची जबाबदारी त्यांच्याकडे दिली. पण त्याचबरोबर काँग्रेसच्या परंपरेनुसार शिवकुमार यांनाही ‘ताकद’ पुरवली. मग शिवकुमार यांनीही निवडणुकीसाठी राज्यभर दौरे केले. ताकदवान उमेदवार दिले. मुत्सद्दीपणा दाखवत भाजप आणि धर्मनिरपेक्ष जनता दल दोघांनाही धोबीपछाड दिला.

सिद्धरामय्या यांना कोठून निवडून आणायचे? एका की दोन मतदारसंघांतून उभे करायचे? याचा निर्णय त्यांनीच घेतला. कारण त्या मागील निवडणुकीत सिद्धरामय्या यांचा ‘गेम’ करण्यासाठी भाजप आणि धर्मनिरपेक्ष जनता दल दोघेही सरसारवले होते. त्यामुळे अतिशय चातुर्याने दोन मतदारसंघांत त्यांना उभे केले होते. पण एका मतदारसंघात सिद्धरामय्या यांचा पराभव झाला होता. पण निसटत्या का होईना दुसऱ्या मतदारसंघातून ते निवडून आले होते. हा अनुभव पाठीशी असल्यामुळेच ‘वरुणा’ या त्यांच्या घरच्या आणि एकाच मतदारसंघात उभे करून त्यांना भरघोस मतांनी निवडून आणले.

यामागे शिवकुमार यांची मोठी ताकद होती. राज्यभरात मर्यादित प्रभाव असूनही निवडणूक जिंकल्यानंतर त्याचे श्रेय सिद्धरामय्या यांना द्यावे लागले. कारण त्यांनाच पुढे करून काँग्रेसने निवडणूक लढवली होती. पण खरे शिल्पकार, ‘किंगमेकर’ ठरले ते शिवकुमारच. ही गोष्ट काँग्रेस श्रेष्ठींनीही कधी अमान्य केली नाही. इथपर्यंत सगळे ठीकठाक होते. पण खरा घोळ सुरू झाला तो कोण मुख्यमंत्री होणार यावरून. मुख्यमंत्रिपदाची नियुक्ती आली त्यावेळी सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात रस्सीखेच सुरू झाली.

देवेगौडांकडून सिद्धरामय्यांची हकालपट्टी

सिद्धरामय्यांचा लोकदल, जनता पार्टी, जनता दल, धर्मनिरपेक्ष जनता दल असा राजकीय प्रवास राहिला आहे. मूळ समाजवादी विचारसरणीचे असल्यामुळे तशा मुशीतच तयार झालेले नेते. जनता दलात माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा वरदहस्त लाभल्याने उपमुख्यमंत्रिपदापर्यत झेप घेतली होती. त्यांची लोकप्रियता पाहून देवेगौडा त्यांना ‘साइडलाइन’ करायला सुरुवात केली. मग सिद्धरामय्या यांनी धन्यालाच आव्हान द्यायचा सुरुवात केली. देवेगौडांना पुत्र कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री करायचे होते. त्यातूनच देवेगौडा आणि सिद्धरामय्या यांच्यात वितुष्ट येऊ लागले. अखेर देवेगौडा यांनी सिद्धरामय्या यांची पक्षातून हकालपट्टी केली.

मुख्यमंत्रिपदाचा ‘रोटेशन’ करार

काँग्रेसकडे राज्यव्यापी इतर मागासवर्गीय (ओबीसी) दमदार चेहरा नव्हता आणि सिद्धरामय्या भाजपकडे जातील, असे कोणालाही वाटत नव्हते. त्यामुळे काँग्रेसने सिद्धरामय्यांना यांना आपल्याकडे खेचले. अखेर 2006 ला ते काँग्रेसमध्ये डेरेदाखल झाले आणि मग त्यांची कारकीर्द बहरत गेली. नंतरच्या निवडणुकीत सर्व काँग्रेशी नेत्यांना मात देत 2013 ते मुख्यमंत्री बनले. आणि पाच वर्षे त्यांनी सुखनैव राज्य केले. कामाची छापही उठवली. विविध कल्याणकाही योजना राबविल्या. पण 2018 च्या निवडणुकीत काँग्रेस हरला. मात्र विरोधी नेतेपद सिद्धरामय्या यांना मिळाले. मग 2023 ची निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली. काँग्रेस जिंकली. पण यावेळी मुख्यमंत्रिपद त्यांच्याकडे आपसूक आले नाही.

यावेळी त्यांच्या समोर होते, दिग्गज नेते ‘किंगमेकर’ शिवकुमार. त्यानंतर पदासाठी रस्सीखेच सुरू झाली. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि हायकमांडकडे मुख्यमंत्रिपदासाठी उमेदवाराचा विषय गेला. उमेदवार निवडीचे गुऱ्हाळ सुरू झाले. सिद्धरामय्या आणि शिवकुमार, कोणीही मागे हटायला तयार नव्हते. अखेर राहुल गांधी, खर्गे यांच्या मध्यस्थीनंतर सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले अन् ते मुख्यमंत्री बनले. तर शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री आणि भक्कम खाती मिळाली.

तसेच प्रदेशाध्यक्षपदही त्यांच्याकडे राहिले. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्रिपदासाठी अडीच वर्षांच्या ‘रोटेशन’चा अडीच वर्षासाठी ‘रोटेशन’ ‘करार’ झाला असावा, अशी चर्चा होती. पण तसे जाहीर कधीच झाले नाही. आता शिवकुमार यांनी इतका मुख्यमंत्रिपदाचा आग्रह धरला आहे की, तसा काहीतरी ‘करार’ झाला असावा अशी दाट शंका राजकीय तज्ज्ञाना वाटते.

शिवकुमार यांची कोंडी

काँग्रेस सरकारला 20 नोव्हेंबरला अडीच वर्षे पूर्ण झाली. गेले दोन-तीन महिने सिद्धरामय्या यांना खुर्ची सोडावी लागणार, अशा बातम्या प्रसुत व्हायला लागल्या. तर, सिद्धरामय्या पाच वर्षे पूर्ण होणारच असे त्यांचे समर्थक, आमदार सांगू लागले. तर शिवकुमार यांचा गटही आक्रमक बनला. कराराप्रमाणे शिवकुमार यांना मुख्यमंत्रिपद द्यावे लागेल, अशी मागणी सुरू होऊन वातावरण तापू लागले. दोन्ही नेत्यांच्या दिल्लीवाऱ्या सुरू झाल्या.

या ना त्या कारणाने दोघेही श्रेष्ठींना वारंवार भेटून येऊ लागले. सिद्धरामय्यांचे हात धरून काँग्रेसमध्ये आलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांनी उघडउघड आता दलित मुख्यमंत्री होणार असे सांगू लागले. दरम्यान, विधानसभेत शिवकुमार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गीत ‘नमस्ते सदा वत्सले जन्मभूमी’ गायले. त्यातून ते भाजपशी संधान साधत आहेत काय, या शंकेने काँग्रेस हादरली.

CM Siddaramaiah Vs DK Shivakumar
Congress High Command : सत्तास्वप्नांमुळे ‘हायकमांड’ मराठी मुलखात

नंतर बिहार निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतला जाईल, असे जाहीर करण्यात आले. पण बिहारमध्ये दलित समाज काँग्रेसपासून दूर गेल्याचा हवाला तज्ज्ञ देत आहेत. त्यातूनच गृहमंत्री परमेश्‍वर यांचेही नाव शर्यतीत आले. आता शिवकुमार यांची अधिकच गोची झाली. तेच मुख्यमंत्री व्हावेत, असे सांगणाऱ्या आपल्याच समर्थकाला त्यांनी नोटीस दिली. ‘करारा’ची जाहीर वाच्यता करायचे टाळले. सिद्धरामय्याच पाच वर्षे मुख्यमंत्री राहतील, असे सांगू लागले. दरम्यान २० नोव्हेंबर उजाडला आणि गेलाही. पण ‘नोव्हेंबर क्रांती’ काही शिवकुमार यांच्या वाटणीला आली नाही. त्यानंतर मग ते इरेला पेटले. आणि ‘सोशल मिडीया’वर खुर्चीसाठी लढाई सुरू झाली.

224 पैकी 135 जागा घेऊन बहुमत

कर्नाटकात काँग्रेस 20 मे 2023 ला सत्तेवर आली. स्पष्ट बहुमताच्या जोरावर म्हणजे 224 जागांपैकी 135 जागा जिंकत एकहाती सरकार स्थापन करण्याचा दावा केला. या निवडणुकीत काँग्रेसला 43 टक्के मते पडली. राज्यातील एक कोटी 67 लाख 89 हजार 272 मतदारांनी काँग्रेसला भरघोस मतदान केले. पारंपरिक प्रतिस्पर्धी भाजपला केवळ 36 टक्के मते मिळाली. तर जागा 66 मिळाल्या. प्रादेशिक पक्ष धर्मनिरपेक्ष जनता दलाला (धजद) केवळ 13 टक्के मते वाटणीला आली. आणि फक्त 19 जागावर समाधान मानावे लागले. काँग्रेसने भाजप आणि धजदचा धुव्वा उडवला.

मुख्यमंत्रिपदाचा ‘करार’ आहे का?

2023 च्या निवडणुका मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेल्या. मात्र नियोजन, तोडीस तोड उमेदवारांची निवड, प्रचारसभा आणि मुत्सद्दीपणा पणाला लावत शिवकुमार काँग्रेसला निवडणूक जिंकून देत ‘किंगमेकर’ ठरले. मात्र, मुख्यमंत्रिपदासाठी नेत्याची निवडीची वेळ आली त्यावेळी शिवकुमार मागे पडले आणि माळ सिद्धरामय्या यांच्या गळ्यात पडली. तत्पूर्वी काँग्रेसच्या संस्कृतीनुसार या पदासाठी रस्सीखेच अपरिहार्यच होती. त्यातूनच ‘रोटेशन’ पद्धतीने सत्तावाटपाचा म्हणजे मुख्यमंत्रिपदाबाबत ‘करार’ झाल्याचे सांगितले जाते. पण त्याबद्दल सध्या तरी कोणालाही माहिती नाही.

‘नोव्हेंबर क्रांती’ झालीच नाही

20 मे 2023 ला काँग्रेस सरकार स्थापन झाले. त्याला 20 नोव्हेंबरला अडीच वर्षे झाली. सप्टेंबर, ऑक्टोबरपासूनच सत्तावाटपाच्या कराराबाबत बातम्या येऊ लागल्या. त्यात शिवकुमार यांच्या गटातील आमदारांनी मुख्यमंत्रिपदाबाबत शिवकुमारांचा करार झाला आहे, असे सांगत वावड्या उडवून दिल्या. प्रसारमाध्यमेही ‘नोव्हेंबरमध्ये क्रांती’ होणार, असे सांगू लागले. पण सिद्धरामय्या आणि शिवकुमार ‘नोव्हेंबर क्रांती’ काही होणार नाही असे सांगत राहिले अन् झालेही तसेच. 20 नोव्हेंबरला तसे काही झालेच नाही.

CM Siddaramaiah Vs DK Shivakumar
flight Cancellation Crisis : विमान वाहतूक विस्कळीत, 'इंडिगो'वर कारवाई होणार..., मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्टच सांगितले

शिवकुमार यांचा ‘हबकी डाव’

‘दिलेले वचन पाळण्यासाठी वेळ लागतो. तोपर्यंत शांत राहा’, असा संदेश काँग्रेस श्रेष्ठींनी शिवकुमार यांना पाठवला असल्याचे समजते. त्यामुळे ‘हबकी डाव’ टाकत शिवकुमार यांनी सिद्धरामय्या यांचे उजवे हात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनाच मध्यरात्री फोन करुन ‘सत्ता वाटपाच्या फॉर्म्युल्या’नुसार मी मुख्यमंत्री झालो, तर तुम्हाला प्रदेशाध्यक्षपद मिळेल. तसेच तुम्हाला उपमुख्यमंत्रिपद मिळावे यासाठीही मी प्रयत्न करेन,’ असे आश्वासन दिल्याची चर्चा आहे.

दरम्यान, शिवकुमारांबरोबरच त्यांच्या गटातील आमदारांचाही सूर अचानक बदलला आहे. जारकीहोळी यांच्यापूर्वीही शिवकुमार यांनी मंत्री जमीर अहमद आणि प्रियांक खर्गे यांच्याशी चर्चा केली. श्रेष्ठींचा निर्णय येण्यापूर्वी सिद्धरामय्यांच्या जवळच्या वर्तुळातील सर्वांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न शिवकुमार यांनी सुरू असल्याचे दिसते.

CM Siddaramaiah Vs DK Shivakumar
Karnatak BJP Politics : कर्नाटकात 'ऑपरेशन लोटस' राहिले दूरच,भाजपच्याच मागे लागला भ्रष्टाचाराचा भुंगा!

सिद्धरामय्या

  • राजकारणात पाच दशकांचा अनुभव

  • जनता दलाच्या मुशीत झाले तयार

  • कायदा, अर्थशास्त्राचे अभ्यासक

  • गरीबी निर्मूलनासाठी काम

  • ‘ओबीसी’ नेता म्हणून राज्यभरात प्रतिमा

शिवकुमार

  • चार दशके राजकारण, समाजकारण

  • मुत्सद्दी, काँग्रेससाठी ‘संकटमोचक’

  • सध्याच्या काँग्रेस सरकारचे शिल्पकार

  • वक्कलिग नेता, पण राज्यभर ओळख

  • प्रशासन, सरकारी खात्यांवर वचक

बलाबल कर्नाटक सरकार (इंडिया आघाडी)

  • काँग्रेस 137

  • सर्वोदय कर्नाटक पक्ष 1

  • अपक्ष 3

  • एकूण- 141

  • विरोधी पक्ष (एनडीए आघाडी)

  • भाजप 63

  • धजद 18

  • एकूण 81

  • अपक्ष 1 (रिक्त)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com