

Karnataka News : सरकारी योजनांच्या नावाचा वापर करून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. आता कर्नाटकातील गृहलक्ष्मी योजनेच्या लाभार्थी महिलांना तीन लाख रुपयांचे कर्ज मिळणार असल्याचे संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या संदेशांमध्ये कर्ज मिळवण्यासाठी काही कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मात्र, राज्य सरकारने अशी कोणतीही कर्ज योजना जाहीर केली नसल्याचे महिला व बालकल्याण विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांनी व्हायरल संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
कर्नाटक सरकारच्या गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा दोन हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेच्या लाभार्थींना आता तीन लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याचा दावा काही संदेशांमधून केला जात आहे. कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवण्यासह अर्ज करण्याबाबतही या संदेशांमध्ये माहिती दिली जात आहे. परिणामी, अनेक महिलांमध्ये या कथित कर्ज योजनेबाबत उत्सुकता आणि संभ्रम निर्माण झाला आहे.
मात्र, गृहलक्ष्मी योजनेच्या लाभार्थी महिलांना तीन लाख रुपयांचे कर्ज देण्याबाबत सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. अशा प्रकारची योजना अस्तित्वात नसल्याचे महिला व बालकल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या संदेशांची सत्यता तपासल्याशिवाय त्यावर कोणतीही कृती करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली महिलांकडून वैयक्तिक माहिती, बँक खात्याचे तपशील, आधार क्रमांक किंवा ओटीपी मागितला जाऊ शकतो. तसेच कर्ज प्रक्रिया, नोंदणी किंवा कागदपत्रांच्या नावाखाली पैसे उकळण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे अनोळखी व्यक्तींना कोणतीही संवेदनशील माहिती देऊ नये किंवा पैसे पाठवू नयेत, असा सल्ला देण्यात आला आहे.
महिला व बालकल्याण विभागाचे उपसंचालक एम. एन. चेतनकुमार यांनीही गृहलक्ष्मी योजनेच्या नावाने पसरवण्यात येणाऱ्या कर्जाच्या संदेशांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. सरकारकडून तीन लाख रुपयांच्या कर्जाची कोणतीही योजना जाहीर करण्यात आलेली नसल्याने लाभार्थींनी अशा अफवांपासून सावध राहावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेच्या नावानेही काही महिलांना मोबाईल संदेश प्राप्त होत असल्याची चर्चा आहे. योजनेचा लाभ बंद झालेल्या महिलांना पुन्हा संधी देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिल्यानंतर ई-केवायसी पूर्ण करण्यासंदर्भातील संदेश काही लाभार्थी महिलांच्या मोबाईलवर येत असल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, याबाबत योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर सूचना नसल्याने महिला व बाल विकास विभागाने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, आधारशी संबंधित ओटीपी कोणालाही सांगू नये आणि अधिकृत सरकारी माध्यमांवरूनच योजनांची माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.