

Karnataka BJP Leader Murder Case News : कर्नाटक भाजप नेते योगेश गौडा यांच्या हत्येप्रकरणात काँग्रेसचे धारवाड मतदारसंघाचे आमदार विनय कुलकर्णी यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाने कुलकर्णी यांच्यासह 10 दोषींना शुक्रवारी (ता. ३१) जामीन मंजूर केला. तसेच विशेष न्यायालयाने सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेला देखील स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती मोहम्मद नवाज आणि न्यायमूर्ती जी. बसवराजू यांच्या खंडपीठाने विनय कुलकर्णी यांच्या अपीलवरील सुनावणीदरम्यान हा निर्णय दिला.
भाजप नेते तथा जिल्हा पंचायत सदस्य योगेश गौडा यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकत निर्घृण हत्या करण्यात आली होती. तर ही हत्या पूर्वनियोजित कटाचा भाग असल्यासह राजकीय वैमनस्यातून करण्यात आल्याचे तपासात उघड झाले होते. तसेच कुलकर्णी यांनी आपल्या अधिकृत पदाचा गैरवापर करून पोलीस यंत्रणेवर दबाव टाकत पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्नही केल्याचे समोर आले होते.
यानंतर कुलकर्णी यांच्यासह 17 जणांना विशेष न्यायालयाने दोषी ठरवले होते. तसेच जन्मठेपेची शिक्षा ठोठावत प्रत्येकी 30 हजार रुपयांचा दंडही ठोठावला होता. मात्र शुक्रवारी कर्नाटक उच्च न्यायालयाने कुलकर्णी यांच्यासह 10 दोषींना अटींसह जामीन मंजूर केला. तसेच लोकप्रतिनिधींसाठीच्या विशेष न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा अपील निकाली लागेपर्यंत स्थगित ठेवण्याचे देखील आदेश दिले आहेत.
उच्च न्यायालयाने विनय कुलकर्णी यांना दोषी ठरविणाऱ्या आदेशालाच स्थगिती दिल्यामुळे त्यांच्या आमदारकीला तात्पुरता दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे. मात्र, काही दिवसांतच त्याचा निर्णय लागणार असून तो काय लागणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. कुलकर्णी यांच्यासह चंद्रशेखर इंडी, दिनेश एम. आणि चन्नकेशव बी. टिंगरीकर यांनाही जामीन मंजूर केला.
न्यायालयाने घातलेल्या अटी प्रत्येकी पाच लाख रुपयांचा जातमुचलका आणि तेवढ्याच रकमेचे दोन जामीनदार द्यावेत, न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय देशाबाहेर जाता येणार नाही. उच्च न्यायालय किंवा खटला चालविणाऱ्या न्यायालयाने बोलावल्यास सुनावणीस हजर राहणे बंधनकारक असेल.
दरम्यान, या प्रकरणातील तपासात कथित अनियमितता, मूळ पुरावे दडपणे आणि बनावट पुरावे तयार केल्याच्या आरोपाखाली सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा झालेल्या तत्कालीन पोलिस निरीक्षक चन्नकेशव बी. टिंगरीकर (आरोपी क्रमांक 19) यांनाही उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असून, त्यांनाही याच अटी लागू आहेत. प्रकरणाचा आढावा 15 जून 2016 रोजी धारवाड येथे जिममध्ये वर्तमानपत्र वाचत असताना भाजप नेते योगेश गौडा यांची हत्या करण्यात आली होती.
पोलिसांनी तपास करून न्यायालयात ‘बी’ रिपोर्ट दाखल केला होता. मात्र, तपास योग्य पद्धतीने झाला नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. 2019 मध्ये विनय कुलकर्णी यांनी पुरावे नष्ट केल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. तत्कालीन मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या कार्यकाळात हा तपास सीबीआयकडे सोपविला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.