बोम्मईंना धक्का..नाराज मंत्री राजीनामा देण्याच्या तयारीत

कर्नाटकात मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाले असले तरी यावरुन गदारोळ सुरुच आहे. यामुळे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई अडचणीत आले आहेत.
karnataka minister anand singh hints about resignation
karnataka minister anand singh hints about resignation
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : कर्नाटकात (Karnataka) मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाले असले तरी यावरुन गदारोळ सुरुच आहे. मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने अनेक आमदार उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत. यातच मंत्रिपद मिळालेल्या नेत्याने कमी महत्वाचे खाते मिळाल्याने राजीनामा देण्याची तयारी केली आहे. यामुळे नवीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

बोम्मई यांनी नुकतेच मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर केले. आनंद सिंह (Anand Singh) यांच्याकडे पर्यावरण व पर्यटन विभाग देण्यात आला. यावरुन आनंद सिंह हे नाराज झाले आहेत. सिंह हे सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. देशातील सर्वांत श्रीमंत राजकारण्यांपैकी ते एक आहेत. राज्यातील काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सरकार पाडणाऱ्या 17 आमदारांमध्ये त्यांचा समावेश होता. राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर येडियुरप्पांनी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला होता. 

खातेवाटपावरुन सिंह यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी पक्ष नेतृत्वासह मुख्यमंत्र्यांना थेट इशारा दिला होता. आता त्यांनी होस्पेटमधील त्यांचे कार्यालय बंद केले आहे. त्यामुळे ते राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. होस्पेटमधील वेणूगोपाल मंदिरात त्यांनी पूजा केली. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी 15 वर्षे राजकारणात आहे. काही नेते आणि मित्र माझे संरक्षण करतील, असा माझा चुकीचा समज होता. मी आता सर्व आशा गमावून बसलो आहें. ईश्वराने आता मला जे योग्य आहे ते करण्याचा आत्मविश्वास द्यावा, तर मग ते माझे बलिदानही का असेना.

मुख्यमंत्र्यांनी अर्थ, बंगळूर विकास आणि मंत्रिमंडळ कामकाज यासह महत्वाची खाती स्वत:कडेच ठेवली आहेत. बी.एस. येडियुरप्पांच्या मंत्रिमंडळात आधी असलेले ज्येष्ठ नेते के.एस.ईश्वरप्पा यांच्याकडे ग्रामविकास व पंचायत राज विकास खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. आर.अशोक यांच्याकडे महसूल, बी.श्रीरामुलू यांच्याकडे परिवहन व अनुसूचित जमाती कल्याण खाती सोपवण्यात आली आहेत. लिंगायत नेते व्ही.सोमण्णा यांच्याकडे गृहनिर्माण, पायाभूत विकास तर प्रभू चव्हाण यांच्याकडे पशुसंवर्धन खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. 

पहिल्यांदाच मंत्रिपद मिळालेले अरगा ज्ञानेंद्र आता गृह खाते सांभाळतील. गोविंद मक्तप्पा करजोळ यांच्याकडे मोठे व मध्यम सिंचन खाते देण्यात आले आहे. मुरुगेश निरानी यांनी मोठे व मध्य उद्योग आणि उमेश कत्ती यांनी वन व नागरी पुरवठा खाते सोपवण्यात आले आहे. डॉ.के.सुधाकर यांच्याकडी आरोग्य खाते आणि डॉ.अश्वत नारायण यांच्याकडील उच्च शिक्षण खाते कायम ठेवण्यात आले आहे.  

कर्नाटकात नुकताच मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. त्यावेळी 29 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. नव्या मंत्रिमंडळात जुन्यांसोबत नव्या चेहऱ्यांनाही स्थान देण्यात आले आहे. नव्या मंत्रिमंडळात 7 ओबीसी, 3 अनुसूचित जाती, 1 अनुसूचित जमाती, 8 लिंगायत, 1 रेड्डी आणि 1 महिला आहे. मंत्रिमंडळात 6 नवीन चेहरे आहेत. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com