Uttar Pradesh Political News : शेतकऱ्यांचे तारणहार म्हणून ओळखले जाणारे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांना यावर्षी केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार जाहीर केला. त्यानंतर उत्तर प्रदेशातील राजकीय गणितं बदलली आहेत.
त्यांचे नातू व राष्ट्रीय लोकदल पक्षाचे प्रमुख जयंत चौधरी यांनी समाजवादी पक्षाशी असलेली आघाडी तोडत भाजपला साथ दिली. आगामी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) त्यांच्यासाठी खास असली तरी चौधरी कुटुंबातील एकही सदस्य या वेळी निवडणुकीच्या रिंगणात असणार नाही.
लोकसभा निवडणुकीत मागील 47 वर्षांत पहिल्यांदाच चौधरी कुटुंब दिसणार नसल्याने तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. चौधरी चरणसिंह (Chaudhary Charan Singh) यांनी उत्तर प्रदेशातील राजकारणाची दिशा बदलली होती. त्यांनी बागपत मतदारसंघातून (Bagpat Constituency) 1977 मध्ये पहिली निवडणूक लढवली. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीपर्यंत चौधरी कुटुंब निवडणुकीच्या रिंगणात होते.
जयंत चौधरी (Jayant Chaudhary) हे सध्या राज्यसभेचे (Rajya Sabha) खासदार आहेत. त्यांनी त्यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू नेते राजकुमार सांगवान यांना लोकसभेचे तिकीट दिले आहे. बागपत मतदारसंघातून चरण सिंह हे 1977 ते 1984 पर्यंत खासदार होते. त्यानंतर त्यांचे पुत्र अजित सिंह यांनी 1989 आणि 1991 मध्ये जनता दल, 1996 मध्ये काँग्रेस (Congress) आणि 1997 मध्ये अपक्ष म्हणून लोकसभेची निवडणूक लढवून विजयी झाले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
1998 मध्ये अजित सिंह (Ajit Singh) यांचा पहिल्यांदा पराभव झाला. त्यानंतर वर्षभरातच झालेल्या निवडणुकीत अजित सिंह यांनी राष्ट्रीय लोकदल (RLD) या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून जिंकलीही. 2004 आणि 2009 या दोन्ही निवडणुकीतही त्यांना विजय मिळाला. 2014 च्या मोदी लाटेत मात्र त्यांचा पराभव झाला, तर 2019 मध्ये जयंत चौधरी यांनाही यश आले नाही.
सलग दोन पराभवानंतर जयंत चौधरी यांनी दोन वर्षांपूर्वी राज्यसभेत जाणे पसंत केले. त्यामुळे 2024 मध्ये ते राज्यसभेचा राजीनामा देऊन लोकसभेच्या रिंगणात उतरणार का, याबाबत उत्सुकता वाढली होती.
अखेर दोन दिवसांपूर्वी त्यांनी सांगवान यांच्या नावाची घोषणा करत त्यावर पडदा टाकला आहे. त्यामुळे बागपतच्या निवडणुकीत पहिल्यांदाच चौधरी कुटुंबातील एकही सदस्य दिसणार नाही.
R
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.