Election Exist Poll, 1 June : दिल्लीच्या तख्तावर जबरदस्त ताकदीने अर्थात, 'चारसो पार'चा नारा खरा ठरवून तिसऱ्यांना 'सत्तावापसी' करण्याच्या हेतुने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) अख्खा देश पिंजून काढला. मोदी-शहांच्या जोडगोळीला दिल्लीपासून लांब ठेवून 10 वर्षांपूर्वी सत्तेतून बाहेर पडलेल्या काँग्रेसने आता पुन्हा सत्तेला मिठी मारण्याची धडपड चालवली आहे. परिणामी, सत्ताधारी विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोपांच्या लढाईत संबंध सव्वादोन महिने म्हणजे, 77 दिवस देशभर प्रचाराचे बार उडाले.
मोदींच्या झंझावातापुढे 2014 आणि 2019 मध्ये बाजी हरलेल्या काँग्रेसला (Congress) आता पुन्हा सत्तेत परतण्याची आशा पल्लवीत झाल्या आहेत. आणि काहीही करून पुन्हा देश जिंकण्याच्या उद्देशाने डाव टाकला असून या सत्तासंघर्षाचा फैसला येत्या मंगळवारी होणार आहे. मात्र, त्याआधीच्या 'एक्झिट पोल'मध्ये कोणाची सरशी होणार आणि कोण सत्तेपासून लांब फेकला जाणार, याचा अंदाज येइलच. त्यामुळे पुढच्या तास-दीड तासांत एक्झिट पोल'मधून लोकसभा निवडणुकीच्या निकालाची दिशा काहीशी स्पष्ट होऊ शकते.
आज 8 राज्यांमधल्या 57 जागांसाठी शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. मात्र, आज देशातील जनतेचं सर्व लक्ष हे शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर आज संध्याकाळी येणाऱ्या एक्झिट पोलकडे लागलं आहे. 'एक्झिट पोल' कोणाला दिलासा देणार आणि कोणाला धक्का देणार याची उत्सुकता अनेकांना लागली आहे. मागील काही महिन्यांपासून रात्रंदिवस देशभरातली विविध मतदारसंघ पालथे घालून राजकीय नेत्यांना आता केवळ 4 जूनच्या निकालाची प्रतिक्षा आहे.
निकाल चार जूनला लागणार असले तरीही 'एक्झिट पोल'चा कौलदेखील निवडणूक प्रक्रियेतील महत्वाचा भाग मानला जातो. याच पोलवरुन देशात कोणाची सत्ता येणार याचा अंदाज बांधला जातो. 'अब की बार चारसो पार' म्हणत भाजपने लोकसभेचं रणशिंग फुंकल होतं तर 'अब की बार हद्दपार' म्हणत इंडिया आघाडीने (India Alliance) एनडीएला आव्हान दिलं होतं. काँग्रेससाठी राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी या भावा-बहिणीच्या जोडीने निवडणुकीच्या मैदानात उतरुन मतदारांना महागाई आणि बेरोजगारीपासून दिलासा देण्याचं आश्वासन दिलं, तर भाजपने मोदींनी देशभरात केलेल्या विकास कामांचं मॉडेल जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.
लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जनता आमच्या पाठीशी असून विजय आमचाच होणार असा दावा दोन्ही बाजून केला जात आहे. परंतू जनतेच्या मनात नेमकं कोण आहे? त्यांना खरंच पुन्हा मोदींच्या हातात देश द्यायचा आहे की परिवर्तन पाहिजे. हे सर्व चार जूनला जाहीर होणार असलं तरी आजच्या एक्झिट पोलमधील आकडेवारीमध्ये भाजपला धक्का बसणार? अब की बार चारसो पारचं स्वप्न हद्दपार होणार? की पुन्हा देशात मोदी सरकार येणार हे निश्चित होणार आहे.
तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, इंधनाचे वाढते दर बेरोजगारी या सारख्या मुद्यांचं पुरेपूर भांडवल करुन तसंच ईडी सीबीआय अशा तपास यंत्रणांचा होत असलेला चुकीचा वापर याकडे मतदारांचं लक्ष वेधणारी इंडिया आघाडी देशात आपला करिष्मा दाखवून देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.