नवी दिल्ली : गोव्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते लुईजिन्हो फेलेरो (Luizinho Faleiro) यांनी बुधवारी कोलकता येथे तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केला. त्यांच्यासोबत गोव्यातील काँग्रेसच्या काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह नऊ जण तृणमूलमध्ये दाखल झाले आहेत. फेलेरो यांनी काँग्रेस सोडण्यात राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा मोठा हात असल्याचा खुलासा फेलेरो यांनीच केला आहे.
मागील काही दिवसांपासून प्रशांत किशोर हे काँग्रेसच्या जवळ गेल्याचे मानले जाते. त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह राहुल व प्रियांका गांधी यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या राजकीय चर्चाही रंगल्या होत्या. त्यातच फेलेरो यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. फेलेरो हे गोव्यातील बडे नेते मानले जातात. तसेच ते राहुल यांचे विश्वासूही होते.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना फेलेरो यांनी प्रशांत किशोर यांच्या भेटींबाबत माहिती दिली. ते म्हणाले, मी तृणमूलमध्ये जाण्यापूर्वी ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना एकदाही भेटलो नाही. मी प्रशांत किशोर यांना भेटलो होतो. पण काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेण्याआधी आमची भेट झाली होती. आमच्यात त्यावर चर्चाही झाली, असं फेलेरो यांनी स्पष्ट केलं आहे. किशोर यांच्याशी चर्चेनंतर फेलेरो यांनी काँग्रेस सोडण्यावर शिक्कामोर्तब केल्याचे सुतोवाच केले आहे.
दरम्यान, फेलेरो यांनी बुधवारी कोलकता येथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत नऊ जणांसह तृणमूलमध्ये प्रवेश केला. यावेळी खासदार अभिषेक बॅनर्जीही उपस्थित होते. फेलेरो यांच्यासह गोवा काँग्रेसचे माजी सरचिटणीस यतिश नाईक व विजय वासुदेव पोय, माजी राज्य सचिव मारिओ पिंटो डी सँटना व आनंद नाईक, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कवी शिवदास सोनू नाईक, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते व माजी आमदार लहू मामलेदार, दक्षिण गोवा वकील संघटनेचे अध्यक्ष अँटोनियो मोंटेरिओ क्लोविस दा कोस्टा, राजेंद्र शिवाजी काकोडकर हे तृणमूलमध्ये दाखल झाले आहेत.
गोव्यात 2017 मध्ये हातातोंडाशी आलेला घास गेला होता. यावेळी पक्षाला गोव्यात सत्ता स्थापन करण्याबाबत अपेक्षा होती. पण दिग्गज नेत्यानं सोडचिठ्ठी दिल्यानं पक्षाला यावेळी इतर नेते व कार्यकर्त्यांना एकसंध ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेसमध्ये सुधारण्याची कोणतीच आशा वाटत नाही. गोवा काँग्रेसमध्येही सर्वकाही ठीक नाही. भाजपविरोधात लढण्यासाठी ममता बॅनर्जी यांच्यासारख्या लढवय्याची गरज असल्याचे फेलेरो दोन दिवसांपूर्वी म्हणाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.