New Delhi : महाराष्ट्रासह आज देशभरातील तब्बल 15 राज्यांमध्ये बिग फाईट्स होत आहेत. त्यामध्ये दोन लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचाही समावेश आहे. 14 राज्यांतील 48 विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकालही आज आहे. बहुतेक ठिकाणी इंडिया आघाडी विरुध्द एनडीए अशी लढत होत आहे.
महाराष्ट्रात सत्ता कुणाची याचा फैसला आज होणार आहे. त्याचबरोबर झारखंडमध्येही काँटे की टक्कर आहे. झारखंडमध्ये 81 जागांसाठी निवडणूक होत आहे. राज्यांत सत्ताधारी इंडिया आघाडी आणि एनडीए अशी थेट लढत होत आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेत ही निवडणूक लढवली.
केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी काँग्रेसच्या उमेदवार असून त्यांची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यांच्या विजय निश्चित मानला जात असला तरी त्या किती मताधिक्याने निवडून येणार याबाबतही उत्सुकता आहे. महाराष्ट्रातील नांदेड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
देशातील 14 राज्यांतील 48 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीच्या निकालाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. उत्तर प्रदेशातील नऊ मतदारसंघात निवडणूक होत असून सत्ताधारी भाजप आणि समाजवादी पक्षामध्ये थेट लढत होत आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी या निवडणुकीसाठी मोठी ताकद लावली होती. राज्यात लोकसभेत भाजपला मोठा धक्का बसला होता.
पश्चिम बंगालमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सहा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. त्यामुळे सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला धक्का बसणार की पुन्हा आपली ताकद दाखवून देणार, याबाबत उत्सुकता आहे. राजस्थानमधील सात मतदारसंघात कोण जिंकणार याचा फैसला आज होईल. काही महिन्यांपूर्वीच राजस्थानमध्ये सत्ता काबीज केल्यानंतर ही निवडणूक होत असल्याने भाजप आपला करिष्मा कायम राखणार का, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
त्याचप्रमाणे आसाममधील पाच, बिहारमधील चार, गुजरातमधील एक, कर्नाटक तीन, केरळ दोन, मध्य प्रदेश दोन, मेघालय एक, पंजाब चार, सिक्कीम दोन, छत्तीसगड एक आणि उत्तराखंडमध्ये एका मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आज निकाल आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.