

Lalu Prasad Yadav: राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव हे युपीए-१ च्या काळात २००४-२००९ या काळात भारताचे रेल्वेमंत्री होते. या मंत्रीपदाच्या कार्यकाळात झालेल्या एका कथित घोटाळ्यानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू कोर्टानं याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाला झटका दिला आहे. त्यानुसार, ९ जणांविरोधात मनी लाँड्रिंगच्या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
कोर्टानं म्हटलं की, लालू प्रसाद यादव यांच्याविरोधातील चौकशी ही राजकीयदृष्ट्या प्रेरित नव्हती. पाटण्यात हस्तांतरीत करण्यात आलेली जमीन घोटाळ्यातून कमावलेली आहे. याप्रकरणी कोर्टानं इतर काही आरोपांना दोषमुक्त केलं आहे. विशेष न्यायाधीश विशाल गोगने यांनी हा आदेश पारित केला आहे. कोर्टानं तोंडी स्वरुपात टिप्पणी केली की, राबडी देवी आणि तेजस्वी यादव या दोघांनी पदाचा दुरुपयोग करुन मिळवलेल्या पैशाचा गैरवापर केल्याप्रकरणी शंका आहे. लालू प्रसाद यादवांच्या सांगण्यावरुन २००५-२०१४ मध्ये त्यांचं हस्तांतरण करण्यात आलं होतं. त्यावेळी लालू प्रसाद हे केंद्रीय रेल्वे मत्री होते.
कोर्टानं पुढे म्हटलं की, लालू प्रसाद रेल्वेमत्री असताना रेल्वे अधिकाऱ्यांद्वारे रांची आणि पुरीच्या हॉटेलचे दोन पट्टे देण्यासाठी निविदेत फेरफार करण्यात आला होता. हॉटेलच्या व्यवस्थापकांनी नंतर पाटण्यात एक भूखंड लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय सहकारी सरला गुप्ता यांना हस्तांतरीत केला होता. त्यानंतर त्यांनी याचे शेअर नाममात्र किंमतीत राबडी देवी यांना विकले होते.
दरम्यान, कोर्टानं लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांच्यासह ९ जणांविरोधात मनी लाँडरिंगचे आरोप निश्चित केले आहेत. तर इतर ७ जणांची कोर्टानं निर्दोष सुटका केली आहे. कोर्टानं सर्व संबंधित आरोपींना ३ ऑक्टोबरला राऊज अव्हेन्यू कोर्टात हजर होण्याचे निर्देश दिले आहेत.
हे प्रकरण कथित 'लँड फॉर जॉब' घोटाळ्याशी संबंधित मनी लाँडरिंग केसचा भाग आहे. ईडीचा आरोप आहे की, रेल्वेत नोकरीच्या आमिषानं जमीन दिली गेली आणि त्यानंतर या संपत्तीशी संबंधित व्यवहारात आर्थिक घोटाळा करण्यात आला. याला 'IRCTC मनी लाँडरिंग केस' म्हणतात. कोर्टानं याप्रकरणी LARA Projects, राबडी देवी, तेजस्वी यादव, लालू प्रसाद यादव, पीसी गुप्ता, सरला गुप्ता, सुजाता हॉटेल्स, विजय कोचर आणि विनय कोचर यांच्याविरोधात मनी लाँडरिंगच्या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.