

Mallikarjun Kharge: राज्यसभेचे विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दहशतवादी असं संबोधन त्यांना भोवलं असून निवडणूक आयोगानं त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. भाजपनं याप्रकरणी निवडणूक आयोगाकडं तक्रार केली होती. तसंच खर्गेंनी माफी मागावी अशी मागणीही करण्यात आली होती.
चेन्नईत कार्यकर्त्यांना संबोधित करताना मल्लिकार्जुन खर्गेंनी AIADMK आणि भाजप युतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यांनी म्हटलं होतं की, अण्णाद्रमुकचे लोक मोदींसोबत कसे काय जाऊ शकतात? कारण मोदी समता आणि न्याय मानत नाहीत. अशा लोकांसोबत हात मिळवणी करणं हे लोकशाहीला कमजोर करण्यासारखं आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दहशतवादी असा उल्लेख केला. पण टीका व्हायला लागल्यानंतर त्यांनी लगेचच यावर स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, "मी असं म्हटलंच नाही की पंतप्रधान दहशतवादी आहेत. मला असं बोलायचं होतं की, मोदी लोकांना आणि राजकीय पक्षांना घाबरवण्याचं आणि धमकावण्याचं काम करत असतात. त्यांच्या कृतीमुळं राजकीय गोटात भीतीचं वातावरण निर्माण होतं. माझ्या टिप्पणीचा उद्देश हा पंतप्रधानांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित करणं होतं त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ला करणं नव्हता"
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या या विधानावर भाजपचे खासदार संबित पात्रा यांनी टीका केली होती. खर्गेंचं हे विधान म्हणजे काँग्रेसनं नियोजित पद्धतीनं केलेला कट असल्याचा आरोप पात्रा यांनी केला होता. पंतप्रधान मोदींना दहशतवादी संबोधनं हे जीभ घसरणं नव्हे तर राहुल गांधींच्या इशाऱ्यावर केलेली टिप्पणी आहे. राहुल गांधी प्रत्येक दिवशी पंतप्रधानांच्याविरोधात अपमानजनक भाषेचा वापर करत आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आता खर्गेंनी देखील पंतप्रधानांचा अपमान केला आहे, हे अत्यंत निंदनीय आहे, अशी प्रतिक्रिया संबित पात्रा यांनी दिली होती. त्यानंतर भाजपकडून निवडणूक आयोगाकडं तक्रार करत खर्गेंवर कारवाई करा तसंच त्यांनी माफी मागावी अशी मागणीही केली होती.
भाजपच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगानं याची दखल घेत मल्लिकार्जुन खर्गे यांना नोटीस पाठवली आहे. या नोटीशीत त्यांना पुढील २४ तासांत त्यांनी पंतप्रधानांबाबत केलेल्या विधानाबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळं आता निवडणूक आयोगासमोर खर्गेंना आपली बाजू मांडावी लागणार आहे. त्यामुळं आता खर्गे काय म्हणतात? याकडं सर्वांचं लक्ष लागून राहीलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.